You are currently viewing सिंधुदुर्गात गृहविलगीकरण बंद

सिंधुदुर्गात गृहविलगीकरण बंद

कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्यांच्या घरातील व्यक्ती फिरतात बाजारात.

संपादकीय….

गृहवीलगिकरण हा खरोखरच संशोधनाचा विषय आहे. अलीकडेच आलेली फ्लॅट संस्कृती, भाडेकरू आदी लोक एक बेडरूम अथवा एक दोन खोल्या असणाऱ्या घरात किंवा फ्लॅटमध्ये होम आयसोलेशनच्या नावावर घरात राहतात, एखादाच टॉयलेट असणाऱ्या घरात कोणताही नियम न पाळला गेल्याने घरातील इतर व्यक्ती देखील पॉझिटिव्ह होतात. दुसरा एक गंभीर विषय म्हणजे पॉझिटिव्ह असणाऱ्या किंवा एखाद्याच्या घरातील व्यक्ती कोरोनाची बळी झालेली असेल त्यांच्या घरातील इतर व्यक्ती देखील बाजारात बिनधास्तपणे फिरत असल्याने कोरोनावर आळा बसण्याऐवजी कोरोना वाढतच आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत नगरपालिका प्रशासनाने अत्यावश्यक असणाऱ्या वस्तू घरपोच देण्याची, घर आणि घरातील व्यक्तींना विलगिकरणात ठेऊन परिसरात पहारे बसवले होते, त्यामुळे संसर्गित व्यक्तीच्या सहवासात आलेल्या व्यक्ती बाजारपेठेत फिरत नव्हता, संपर्कातील व्यक्तींची तपासणी होत होती, परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तशी व्यवस्था केलेली नसल्याने संसर्गित व्यक्तींच्या संपर्कात आलेले लोक कोणतीही काळजी न घेता कोरोना पसरवत आहेत. त्यामुळे कोरोना झपाट्याने वाढत असून सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोनमध्ये गेला आहे.
राज्याच्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सिंधुदुर्गात होम आयसोलेशन बंद, संस्थात्मक आयसोलेशन करण्याची घोषणा केली. प्रशासनाने देखील १० शाळा ताब्यात घेऊन त्यात कोरोना संक्रमित रुग्णांना ठेवणार असे जाहीर केले. परंतु ताब्यात घेतल्या जाणाऱ्या शाळांमध्ये रुग्णांना झोपण्यासाठी लागणारे बेड, फॅन, आंघोळीसाठी गरम पाण्याच्या सुविधा, संडास बाथरूमची व्यवस्था, कमी जास्त प्रमाणात संक्रमण असणारे रुग्ण वेगवेगळे ठेवण्याची व्यवस्था, आणि त्यांच्यासाठी लागणारा कर्मचारीवर्ग अशा अनेक सुविधांची गरज आहे, युद्धपातळीवर प्रशासनाला या सुविधा निर्माण कराव्या लागणार आहेत. अन्यथा रुग्णांचे नातेवाईक शाळांमध्ये डबे पुरविण्यासाठी येणार, गप्पा मारणार, शाळेत झोपण्याची व्यवस्था नसली तर रुग्ण रात्री झोपण्यासाठी घरी जातील अशी सुद्धा भीती आहे. त्यामुळे प्रशासनाला योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.
कोरोना संक्रमित रुग्ण संस्थात्मक विलगिकरणात ठेवल्यावर त्यांच्या घरातील व्यक्तींना घराबाहेर पडण्यास मज्जाव करावा लागेल, त्यासाठी त्या त्या विभागात समिती स्थापन करून त्यांच्यावर जबाबदारी द्यावी लागेल, तरच कोरोनाचे संक्रमण कमी होऊन जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × three =