You are currently viewing गोवा बनावटीच्या दारूच्या धंदेवाले राजे झाले मालामाल….

गोवा बनावटीच्या दारूच्या धंदेवाले राजे झाले मालामाल….

तारुण्यात अवैद्य धंद्यात गुरफटलेले प्यादे मात्र होताहेत आयुष्याच्या सारीपटावरून बाद…

गोवा बनावटीच्या दारूचे जाळे दिवसेंदिवस वाढतच आहे. खकितील विकल्या जाणाऱ्यांना हाताशी धरून गोव्यातून खुलेआम दारूची वाहतूक होते. बेकायदेशीर काम कधीही खाकीचा आशीर्वाद असल्याशिवाय होत नाही, मग ते पोलीस असो वा एक्साईज डिपार्टमेंट. सगळीकडेच भ्रष्टाचाराने पोखरलेली माणसे आहेतच. आणि त्याचाच फायदा घेतात दारूच्या धंद्यातील गोंधळी.
गोव्यातून स्वस्त दारू मोठ्या प्रमाणावर आणून महाराष्ट्रात त्यात भेसळ करून परमिट रूम आणि गावागावातील छोट्या मोठ्या दारूच्या अड्ड्यांवरून त्याची विक्री केली जाते. त्यामुळे कित्येक गावांमध्ये दारूचे अड्डे मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहेत. त्यांनाही आशीर्वाद असतो तो दारूच्या राजांचा, म्हणून त्यांच्यावरही कधी कारवाई होताना दिसत नाही. भेसळ करून महाराष्ट्राचे लेबल लावलेला हा दारूचा धंदा या दारूच्या गोंधळ्यांना मालामाल करतो. लाखो रुपयांच्या 4/4 गाड्या घेऊन ते ऐश आरामात फिरत असतात. त्यांच्या बंगल्यांवर मजले वाढत राहतात. वर्षाकाठी करोडो रुपयांची संपत्ती मिळवतात, ऐश्वर्य त्यांच्या दारात लोळत राहतं.
आपल्या दारूच्या धंद्यांवर पोलीस अथवा एक्साईज खात्याकडून कारवाई होऊ नये म्हणून हफ्ता तर असतोच, परंतु राजकारण्यांना सुद्धा हाताशी धरून राजकारणातील एखादं पद घेऊन राजकीय आशीर्वाद सुद्धा सोबत ठेवतात. त्यामुळे कोणाची वक्रदृष्टी त्यांच्यावर पडत नाही. राजकीय पदाच्या आडोशाने हे दारुवाले स्वतःला प्रतिष्ठित म्हणवून घेण्यात धन्यता मानतात. त्यासाठी समाजसेवेचा बुरखा देखील पांघरतात.
दारूचे बादशाह मात्र मालामाल होतात, परंतु त्यांच्या संपत्तीकडे आकर्षित होऊन, दारूच्या धंद्यातून आपणही श्रीमंती मिळवू म्हणून दारूच्या बरबटलेल्या दुनियेत पाऊल ठेवतात आणि स्वतःसुद्धा व्यसनाधीन होऊन दारुवाल्यांचा हातचे बाहुले बनून राहतात. एक दोन वेळा पोलिसांच्या कचाट्यात सापडल्यावर भले दारुवाले त्यांना जामिनावर सोडवतात, परंतु समाजात त्यांच्यावर गुन्हेगार म्हणून शिक्का बसतो, तो शेवटपर्यंत पुसला जात नाही. पैशांच्या हव्यासापोटी आणि ऐश आरामाच्या जीवनाच्या स्वप्नांपोटी तरुण पिढी मात्र दारू वाहतूक, दारू विक्री सारख्या व्यवसायात पार गुरफटून जाते.
लांबून सुंदर दिसणाऱ्या दारूच्या भुलभुलैय्या दुनियेत दारूचा धंदा करून भेसळयुक्त दारू तरुणांच्या मदतीने वाहतूक विक्री करणारे मालामाल होतात परंतु दारू धंद्यांच्या सारीपटावर खेळणारे प्यादे मात्र ऐन तारुण्यात स्वतःवर दारूचे गुन्हे दाखल झाल्याने आणि व्यसनाधीन होऊन आयुष्याच्या सारीपटावरून कायमचेच बाद होतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा