You are currently viewing सिंधुदुर्गचे पालकमंत्री संशोधनाचा विषय..

सिंधुदुर्गचे पालकमंत्री संशोधनाचा विषय..

*नॉन प्लेइंग कॅप्टन*

 

सिंधुदुर्ग जिल्ह्याला कित्येकदा मंत्रिपद नसल्याने पालकमंत्री पदी जिल्ह्याच्या बाहेरीलच व्यक्ती पालकमंत्री म्हणून लाभते. माजी पालकमंत्री नारायण राणे आणि दीपक केसरकर यांचा अपवाद वगळता जिल्ह्यावर पालकमंत्री म्हणून बाहेरीलच व्यक्ती *नॉन प्लेइंग कॅप्टन* सारखी पदाचा उपभोग घ्यायची. त्यामुळे जिल्ह्याचा विकास कित्येकवर्षं रखडलेला होता. जिल्ह्याला जोपर्यंत हक्काचे मंत्रिपद, पालकमंत्री पद मिळत नाही तोपर्यंत जिल्ह्याबद्दल बाहेरून आयात केलेल्या कोणालाही आस्था वाटणार नाही, आणि जिल्ह्याचा विकास होणार नाही.

नारायण राणे पालकमंत्री असताना विकासाला वेग होता, परंतु काहीवेळा आमदारकी असूनही सत्तेत विरोधी पक्ष असताना मात्र तोच वेग मंदावत जायचा. सावंतवाडीचे सुपुत्र दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांनाच टक्कर देत मंत्रिपद आणि जिल्ह्याचे हक्काचे पालकमंत्री पद स्वतःकडे खेचून आणले, जिल्ह्यात पाच वर्षात कधी नव्हे एवढा निधी देखील आणला. परंतु काट शहाच्या राजकारणात निधी येऊनही विकास म्हणावा तसा झाला नाही, केसरकर यांची मवाळ वृत्ती, भ्रष्टाचार विरहित राजकारण यामुळे ते सत्तेच्या सारिपाटावरून दूर झाले.

महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आमदार असलेले केसरकर यांच्या गळ्यात नक्कीच मंत्रिपदाची माळ पडणार नाही हे निश्चितच होते. आणि शरद पवार यांच्या हातात सत्तेचा रिमोट कंट्रोल असल्याने झालेही तसेच, केसरकर यांना मंत्रिपद न मिळाल्याने पालकमंत्री पदाची धुरा पुन्हा एकदा मूळ सिंधुदुर्ग वासीय परंतु रत्नागिरी कर्मभूमी असलेले उदय सामंत यांच्या हाती गेली. तरुण तडफदार दबंग नेतृत्व म्हणून ख्याती असलेले उदय सामंत यांच्या हातात सिंधुदुर्ग जिल्ह्याची नाडी असल्याने जिल्ह्यात विकास झपाट्याने होईल आणि शिवसेना जी जिल्ह्यात एक नंबर वर होती ती सर्व सत्तास्थानी विराजमान होईल, पक्ष जिल्ह्यात जोमाने वाढेल अशी आशा होती. परंतु *जिल्ह्याचे पालकमंत्री हा संशोधनाचा विषय* अशीच काहीशी परिस्थिती जिल्ह्याची झाली आहे. केसरकर मवाळ होते, अधिकारी त्यांचे ऐकत नव्हते, केसरकरांमुळे शिवसेना बॅक फुटवर गेली असे कितीतरी टोमणे बोलले जायचे, परंतु आता जिल्ह्याला मिळालेल्या तरुण तडफदार पालकमंत्र्यांकडून जिल्ह्याचा किती विकास झाला? जिल्ह्यात किती निधी आला? जिल्ह्यातील अधिकारी खाली माना घालून निष्ठेनेच काम करतात का? पालकमंत्री जिल्ह्यात किती दौरे करतात जिल्ह्यावर त्यांचा किती होल्ड आहे? आणि मुख्य म्हणजे नारायण राणेंसारख्या तगड्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना केसरकर यांनी सत्तेपासून दूर ठेवत जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी सेनेचा वरचष्मा राखलेला, आज सध्याच्या पालकमंत्र्यांच्या काळात सेना कुठे आहे? ग्रामपंचायत पातळीवर सुद्धा सेना बॅक फुटवर का गेली?

शिवसेनेच्याच नेत्यांनी स्वतःच्याच पक्षाच्या पालकमंत्र्यांचे पंख छाटले आणि शिवसेनेला बॅक फुटवर जाण्यास भाग पाडले ही वस्तुस्थिती आहे. महाविकास आघाडीची सत्ता येताच, केसरकरांना मंत्रिपद न देता, त्यांना जिल्ह्याच्या राजकारणापासून दूर ठेवत एका दगडात दोन पक्षी मारून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हद्दपार झालेली राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात पुन्हा जिवंत केली. शिवसेनेच्या कपाळकरंट्या राजकारणामुळे सावंतवाडीत शहराची सत्ता देखील गेली आणि आजूबाजूच्या गावांमधील सत्ता सुद्धा भाजपाच्या हाती गेली. पालकमंत्री म्हणून सध्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्हा विकासाचे कोणतेही काम जिल्ह्यात आणलेले तर दिसत नाहीच परंतु स्वतःचा पक्ष वाढीच्या दृष्टीने देखील काही प्रयत्न केलेले दिसत नाहीत, त्यामुळे अशीच परिस्थिती राहिली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि शिवसेना पक्षाच्या वरिष्ठांमुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शिवसेनेचा राष्ट्रवादी व्हायला वेळ लागणार नाही हे निश्चितच….

प्रतिक्रिया व्यक्त करा