गणेशभक्त, चाकरमानी, भजनमंडळांनी काळजी घेऊनच साजरा करावा गणेशोत्सव…

गणेशभक्त, चाकरमानी, भजनमंडळांनी काळजी घेऊनच साजरा करावा गणेशोत्सव…

गणेशभक्त, चाकरमानी, भजनमंडळांनी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेऊनच साजरा करावा गणेशोत्सव…
संवाद मीडियाचे आवाहन.
गणेशोत्सव… कोकणवासीयांच्या श्रद्धेचा, भावनेचा, आणि सर्वात आवडता सण. देश विदेशातून कोकणकर मोठ्या संख्येने आपापल्या घरी गणेशोत्सवासाठी येतात. कोकणात घरोघरी गणेशोत्सव उत्साहाने, आनंदाने साजरा केला जातो. आपल्या प्रिय बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी गणेशभक्तांची पावले आपल्या गावातील घरट्याकडे वळतात. गणपतीच्या पूजेसाठी गणेशभक्तांचा, लहानथोर मंडळींचा उत्साह शिगेला पोचलेला असतो.
गणेशाच्या दर्शनासाठी गावागावात घरोघरी जायची पद्धत आहे. दुपारच्या महाप्रसादाचा मोठमोठ्या घरात, एकत्र कुटुंबात पंगती बसतात. संध्याकाळपासून वाडीवाडीत आरती, भजने खूप मोठ्या उत्साहाने केली जातात. बऱ्याच गावांमध्ये गणेश चतुर्थीची संपूर्ण रात्र भजनाने जागर केला जातो. गौरी पूजन, होवसा वगैरे सारखी धार्मिक कार्ये पार पाडली जातात.
विसर्जनासाठी मोठमोठ्या मिरवणुकी निघतात. ढोल ताशे वाजवतात,फटाके फोडतात. गणेशाचा उत्सव कोकणात आनंदात साजरा केला जातो. त्यामुळे गणेशोत्सवात भक्तांचा महापूर येतो, सर्वजण एकत्र येतात.
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव घराच्या घरी साधेपणाने साजरा करावा असं आवाहन सरकारने गणेश भक्तांना केले आहे. अनेक गणेशभक्त, चाकरमानी बाहेरील जिल्ह्यातून, राज्यातून प्रवास करून आले आहेत. त्यातच जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या विषाणूचे संक्रमण वाढले आहे. स्थानिक नागरिक सुद्धा कोरोनाच्या विळख्यात सापडू लागले आहेत. एकंदरीत जिल्ह्यात वाढत असलेले रुग्ण पाहता जिल्हा संकटाच्या तिरावरून प्रवाहाच्या दिशेने जाताना दिसत आहे.
*संवाद मीडिया कडून जिल्हावासीयांना आवाहन करण्यात येत आहे की*, आपल्या प्रिय बाप्पाचे पूजन, आरती, भजन, महाप्रसाद हे घरच्याघरी करावे. एक दुसऱ्यांच्या घरी दर्शनास जाण्याचे टाळावे. एकत्र येऊन आरत्या, भजने करू नयेत जेणेकरून कोरोनाचे समूह संक्रमण टाळता येईल. आपला उत्सव आनंदात जाण्यासाठी आपली व आपल्या प्रियजनांच्या आरोग्याची काळजी आपणच घ्यायची आहे.
आजपासून सुरू झालेल्या *श्री गणेशोत्सवाच्या* तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा. विघ्नहर्ता श्री गणेश तुमच्या सर्व चिंता, दुःख, कोरोना विषाणू, आणि पारिवारिक भेदभाव, प्रापंचिक विवंचना दूर करून तुमच्या जीवनात सुख, समाधान, शांती आणि अत्यानंद आणू देवो. हा गणेशोत्सव सुफळ, सुधन, संपन्न होऊ दे हीच *संवाद मिडियाकडून ब्रह्मांड नायकाकडे दोन्ही कर जोडोनी प्रार्थना…*

प्रतिक्रिया व्यक्त करा