You are currently viewing प्रवीण भोसले यांच्या वाढदिवस सोहळ्यास सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती

प्रवीण भोसले यांच्या वाढदिवस सोहळ्यास सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती

सावंतवाडी :

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांचा 75 वा वाढदिवस सोमवारी सायंकाळी सावंतवाडी येथील आरपीडी हायस्कूलच्या सभागृहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप तसेच अध्यक्ष म्हणून सावंतवाडी संस्थांचे राजे खेमसावंत भोसले उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करू कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी केक कापून प्रवीण भोसले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

देव पाटेकर महाराजांवर असलेले नितांत भक्ती आणि सतत पाटेकरांचे नाव मुखी असणारे प्रवीण भोसले यांचे व्यक्तिमत्व ऋषितुल्य आहे. आज मराठी जनतेचे नेते, कोकणचे नेते आणि प्रेमळ, मनमिळावू व्यक्तिमत्व असलेल्या प्रवीण भोसले यांचा 75 वा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा होत आहे. या निमित्ताने त्यांचा करण्यात आलेला सत्कार हा व्यक्तीचा सत्कार नसून तुमच्या घराण्याचा सत्कार आहे. कित्येक वर्षांपूर्वीच्या तुमच्या वंशजांची परंपरा तुम्हाला लाभली आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत तुमचे काका जगन्नाथराव भोसले हे सेनापती होते. त्यांचा वारसा तुम्हाला लाभला आहे. तर खेड्यापाड्यातील गोरगरिबांचे विधानसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार प्रतापराव भोसले यांचे तूम्ही पुत्र असून त्यांचे आशीर्वाद तुमच्या मागे आहेत. आणि हा सत्कार या सर्वांचाच आहे. असे मत प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांनी सावंतवाडी येथे व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला नेत्या सौ. अर्चना घारे, उद्धव ठाकरे गटाचे संजय पडते, संदेश पारकर, बाळा गावडे, तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डॉन्टस सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, बबन साळगावकर, संजू परब, पुंडलिक दळवी अशा सर्व पक्षीय नेत्या सोबत प्रवीण भोसले यांच्या पत्नी सौ. अनुराधा भोसले या व्यासपीठावर उपस्थित होत्या.

याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर श्रीमंत खेमसावंत भोसले, आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत,ॲड. नकुल पारसेकर, विकास सावंत, मनीष दळवी, संदेश पारकर, प्रवीण भोसले यांचे बंधू रवींद्र भोसले यांनी आपले विचार यावेळी व्यक्त केले आणि प्रवीण भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मित्र मंडळ व कार्यकर्त्यांचे आभार मानताना प्रवीण भोसले म्हणाले, आपल्या सर्वांच्या कृपेने मी आज आयुष्याची 75 वर्षे पूर्ण केली. मला आशीर्वाद देण्यासाठी माझे राजकीय गुरु भाईसाहेब सावंत यांचे पुत्र विकास सावंत, सुप्रसिद्ध कायदातज्ञ ॲड. बाप्पा नार्वेकर यांचे पुत्र ॲड. दिलीप नार्वेकर, सावंतवाडी संस्थानचे राजे शिवरामराजे भोसले यांचे पुत्र खेमसावंत भोसले, माझे स्नेही रमाकांत भाई खलप, हे आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित आहेत हे माझे भाग्य आहे. तुम्ही 75 वा वाढदिवस साजरा करून सर्व जनतेचे आभार मानायला मला संधी दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. राजे साहेबांचे नातू लखमराजे यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांना मी शुभेच्छा व आशिर्वाद देतो. यापुढे राजकीय व्यक्तिमत्व म्हणून सावंतवाडी मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला नेत्या सौ. अर्चना घारे या योग्य व्यक्ती असून त्यांच्याकडून भ्रष्टाचार होणार नाही याची ग्वाही मी देतो असे प्रवीण भोसले यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. अर्चना घारे परब यांनी केले. प्रवीण भोसले यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्यातून तसेच गोवा, कोल्हापूर, पुणे येथून त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होता. प्रवीण भोसले यांना शुभेच्छा देण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवयानी टेंमकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + 13 =