You are currently viewing लोकसंस्कृतीतील स्त्री साहित्य कृषी संस्कृतीशी निगडीत – स्वयंसिद्धा व गझलपुष्पच्या वतीने महिला दिन साजरा

लोकसंस्कृतीतील स्त्री साहित्य कृषी संस्कृतीशी निगडीत – स्वयंसिद्धा व गझलपुष्पच्या वतीने महिला दिन साजरा

चिंचवड / (प्रतिनिधी) :

प्रतिभा महाविद्यालय सभागृहात स्वयंसिद्धा आणि गझल पुष्प यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

लोकसंस्कृतीची व्याप्ती फार मोठी आहे. लोकसाहित्य हे कृषीसंस्कृतीशी जोडलेले आहे. या संस्कृतीत स्त्री साहित्य विपुल प्रमाणात आहे. या साहित्यात तिचा गोतावळा, निसर्ग, सणवार, उत्सव यावर भर दिसतो. हे साहित्य ओवी, गीते यात गुंफले आहे. असा भावार्थ असलेला ‘लोकसंस्कृतीतील स्त्री साहित्य” हा कार्यक्रम ज्योत्स्ना चांदगुडे आणि वैशाली मोहिते यांनी सादर केला.

‘स्वयंसिद्धा प्रतिष्ठान’ आणि ‘गझलपुष्प’ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पारंपारिक स्त्री साहित्याचा आढावा, गझल मुशायरा, आणि कवयित्री संमेलन असा त्रिवेणी संगम घडवून आणला.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून नारी मंचच्या अध्यक्ष मा. अनिता शहा उपस्थित होत्या, तर उत्तर सोलापूरच्या तेलंगाव शाळेतील मुख्याध्यापिका वसुंधरा शर्मा यांची मुख्य उपस्थिती होती. यावेळी जेष्ठ कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे आणि वैशाली मोहिते यांनी ‘लोकसंस्कृतीतील स्त्री साहित्य’ या विषया अंतर्गत मौखिक साहित्याच्या आधारे जुन्या महिलांच्या साहित्याचा आस्वाद सर्व उपस्थितांना दिला. यामध्ये पारंपारीक स्त्री साहित्यातील लोकगीते, लोककथा, उखाणे, भोंडल्याची गाणी, जात्याच्या ओव्या, प्रामुख्याने 16 संस्काराच्या ओव्या व त्यातील विवाह विषयीच्या अनेक ओव्या गाऊन सादर केल्या .त्यामागची भूमिका स्पष्ट केली आणि सगळ्या उपस्थितांची दाद मिळवून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

गजल मुशायरा या सत्रामध्ये निरुपा महाजन- पुण, रेणुका कटी पुरोहित -पिंपळे सौदागर, सुनीती लिमये -पुणे, माधुरी वानखेडे-अकोला, संध्या पाटील -कराड, सारिका माकोडे -चिंचवड, या महिला गझलकारांनी सुंदर गझला सादर केल्या. मुशायऱ्या ने पूर्ण कार्यक्रमाला रंगत आणली. सुनीती लिमये यांची तरन्नुम आणि संध्या पाटील यांनी ‘तू जरी केलेस आता बंधनातून मोकळे,मी कशी उपटून टाकू खोल रुजलेली मुळे’, तसेच सारिका माकोडे भड यांनी सादर केलेल्या गझलेतील ‘जाच असावा तिला सासरी फक्त कुणाला कळला नाही,वळ लपवाया पाठीवरचे पदर तिचाही ढळला नाही’, हे व असे बरेच शेर भरपूर दाद आणि टाळ्या कमावून गेले. या मुशायराचे सूत्रसंचालन गझलकारा सरोज चौधरी यांनी केले.

यावेळी झालेल्या कवयित्री संमेलनात, मृणाल जैन – यांची कधी कविता होते काय, प्राजक्ता वेद पाठक -देह बाधा, अस्मिता चांदणे-लेक, शिल्पा जोशी- प्रेरणा, चिन्मय चिटणीस -ओठावर किंचित हसू, संगीता वेताळ- स्वाती संतोष महाडिक, प्रतिभा मगर -अभिनय, वसुंधरा शर्मा -गोतावळा, माधुरी विधाटे- मालन, योगिता पाखले-प्रॉमिस, नेहा चौधरी -डायरी, सुप्रिया लिमये- तिची भीती आणि तिच्या भिंती, फुलवती जगताप -स्वप्नात आली, रेणुका हजारे -स्वानंदी जग, प्रिया निफाडकर -बाईचं बाईपण, वैशाली गावंडे -ती, शोभाताई जोशी -पाटलाच्या पोराचं लगीन, सीमा गांधी- ती विस्तारीत असते अशा विविध आशयाच्या विविध स्त्री जाणिवेच्या कविता सादर करीत काव्यमैफिल भारावून टाकली. या काव्यसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन दिनेश भोसले यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक स्वयंसिद्धाच्या अध्यक्षा सविता इंगळे यांनी केले, तर गझलपुष्पचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी गझलपुष्पची भूमिका सांगितली.

कार्यक्रमासाठी लोककवी सुरेश कंक, मदन देगावकर, जगदीप वनशीव, डॉ. अगरवाल, अशोक महाराज गोरे, शामराव सरकाळे, राजेंद्र घावटे, नितीन हिरवे, निलेश शेंबेकर, प्रशांत पोरे अभिजीत काळे, हेमंत जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा बालगोपाल यांनी केले. कार्यक्रमाच्या संयोजनात प्रतिभा कॉलेजच्या प्राध्यापिका अमिता देशपांडे यांचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + 1 =