मालवण | प्रतिनिधी:-
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त युथ बिट्स फॉर क्लायमेट, वनशक्ती व सिंधुकन्या लोकसंचलित साधन केंद्र यांच्या तर्फे मालवण मध्ये आज “मावळे कधी जागे होणार?” जनजागृती रॅली काढण्यात आली. मालवण बस स्थानक ते फोकांडा पिंपळ असा या रॅली चा मार्ग होता.
महाराजांचे झाडांविषयी प्रेम, पर्यावरण जपण्याविषयी आपुलकी व महाराज्यांच्या स्वराज्यात स्त्रियांना असलेला आदर व त्यांना भेटणारे संरक्षण या दोन विषयांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी या रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
या रॅली मध्ये महाराज्यांच्या काळातील सुरक्षित स्त्री आणि आजच्या जगातील असुरक्षित स्त्री या दोन्ही विरोधाभास दाखवणाऱ्या गोष्टी प्रखरपणे मांडण्यात आल्या. आताच्या काळातील मावळ्यांनी जागे होऊन महाराजांसारखी निसर्ग व स्त्रियांची काळजी घ्यावी, त्यांचा सन्मान करावा आणि खऱ्या अर्थाने स्वराज्य स्थापित करावे असे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमात मेगल डिसोझा (यूथ बिट्स फॉर क्लायमेट, इकॉमेट्स अध्यक्षा), यथार्थ खावणेकर ( वनशक्ती project officer), ऐश्र्वर्य मांजरेकर (वसुंधरा जनकल्याण फाउंडेशन अध्यक्ष), अमरीश मिस्री (जिल्हा समन्वय अधिकारी माविम सिंधुदुर्ग), शैलेश सावंत (उपजीविका सल्लागार सिंधुकन्या CMRP), रिया घाडी (सिंधुकन्या CMRP अध्यक्ष), त्यांचा स्टाफ, इतर युवक व मालवणवासीय उपस्थित होते.
