इयत्ता बारावी फेब्रुवारी-मार्च 2027 परीक्षेसाठी ऑनलाइन आवेदनपत्र प्रक्रिया सुरू
सिंधुदुर्गनगरी
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) फेब्रुवारी-मार्च 2027 परीक्षेच्या आवेदनपत्रांची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आपली आवेदनपत्रे संबंधित उच्च माध्यमिक शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत विहित मुदतीत भरावीत.
नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL प्रणालीतील PFN-ID वरून न घेता 2025-26 मध्ये इयत्ता 11 वीला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या FYJC Online Data वरून भरून घेण्यात येणार आहेत. मात्र MCVC आणि ITI विद्यार्थ्यांचा डेटा FYJC Online मध्ये उपलब्ध नसल्याने त्यांची आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीने स्वतंत्रपणे भरावी लागणार आहेत. तसेच FYJC Online मध्ये डेटा उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधून आवश्यक माहिती सादर करावी.
आवेदनपत्र भरण्याचे महत्त्वाचे वेळापत्रक
नियमित शुल्कासाठी आवेदनपत्रे भरण्याची प्रक्रिया 14 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. नियमित शुल्कासह आवेदनपत्रे 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत, विलंब शुल्कासह आवेदनपत्रे 1 ते 15 नोव्हेंबर 2026 या कालावधीत तर अतिविलंब शुल्कासह 16 ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत भरता येतील. संबंधित उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी शुल्क पावती व विद्यार्थ्यांची Pre-List विभागीय मंडळाकडे 7 डिसेंबर 2026 पर्यंत जमा करावी.
पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत विद्यार्थी, तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, ITI मार्फत Transfer of Credit घेणारे विद्यार्थी तसेच HSC Vocational Stream मधील विद्यार्थ्यांची माहिती FYJC Online मध्ये उपलब्ध नसल्याने त्यांची आवेदनपत्रेही विहित कालावधीत ऑनलाइन पद्धतीने भरावी लागणार आहेत.
आवेदनपत्रासाठी गेल्या सहा महिन्यांत काढलेला व्यावसायिक रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. फोटो JPG स्वरूपातील असून त्याचा आकार 25 ते 40 KB दरम्यान असावा. फोटोचा पार्श्वभाग पांढरा किंवा साध्या रंगाचा असावा. विद्यार्थ्याचा चेहरा स्पष्टपणे समोरून दिसणे, दोन्ही डोळे व कान स्पष्ट दिसणे आवश्यक आहे. चेहऱ्यावर केस किंवा मास्क नसावा. शक्यतो शालेय गणवेशातील फोटो वापरावा.
फोटो JPG फॉरमॅटमध्येच असावा. PNG किंवा BMP फाईलचे नाव बदलून JPG करणे ग्राह्य धरले जाणार नाही. आवेदनपत्र मंडळाकडे पाठविल्यानंतर तसेच प्रवेशपत्र तयार झाल्यानंतर फोटोमध्ये कोणताही बदल करता येणार नसल्याने विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घ्यावी.
विद्यार्थ्यांच्या नावात, जन्मतारखेत किंवा अन्य माहितीमध्ये त्रुटी राहू नयेत यासाठी Pre-List अथवा आवेदनपत्राच्या प्रिंटवर विद्यार्थी व पालकांची स्वाक्षरी घेण्याच्या सूचना मंडळाने दिल्या आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची माहिती जनरल रजिस्टरनुसार तपासून Pre-List वर प्रत्येक पानावर प्राचार्यांची स्वाक्षरी व शिक्का करणे आवश्यक आहे.
महाविद्यालयांनी आवेदनपत्रे भरल्यानंतर SBI Online Payment Gateway द्वारे परीक्षा शुल्काचा भरणा करावा. शुल्क भरल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांच्या Application Status मध्ये ‘Draft’ ऐवजी ‘Send to Board’ आणि Payment Status मध्ये ‘Not Paid’ ऐवजी ‘Paid’ असा बदल झाला आहे की नाही, याची खातरजमा करणे आवश्यक आहे. ‘Send to Board’ व ‘Paid’ स्थिती असलेली आवेदनपत्रेच मंडळाकडे प्राप्त झाल्याचे गृहीत धरले जाईल.
जुन्या पद्धतीचे बँक चलन वापरू नये तसेच मंडळाकडे रोख स्वरूपात शुल्क स्वीकारले जाणार नाही, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे. ज्या विद्यार्थ्यांचा APAAR-ID उपलब्ध आहे, त्याची नोंद आवेदनपत्र भरताना करावी.
आवेदनपत्रे भरताना चुका टाळण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांनी आवश्यकतेनुसार दुय्यम लॉगिन तयार करून संगणक प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांकडून आवेदनपत्रे भरून घ्यावीत आणि मुख्य लॉगिनद्वारे त्यांची तपासणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
इयत्ता 12 वी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने भरावयाची आहेत. विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार नाहीत. आवेदनपत्रे सादर करण्याच्या अंतिम तारखांना मुदतवाढ दिली जाणार नसल्याने विद्यार्थी, पालक, प्राचार्य व कनिष्ठ महाविद्यालयांनी याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
