You are currently viewing राजकीय बुरख्याआडच्या धंद्यांमुळे…बदनाम कोण होतं?

राजकीय बुरख्याआडच्या धंद्यांमुळे…बदनाम कोण होतं?

संपादकीय…..

माणूस बदलतो तसा निसर्ग बदलत जातो…परंतु माणूस बदलला की अवतीभवती असणारी माणसे मात्र माणसाला सोडून जातात…आणि संधीसाधू सभ्यतेचा बुरखा पांघरून आजूबाजूला वावरू लागतात. अशावेळी खरोखरच जी गरजेची, तन मन धन अर्पून साथ देतात त्यांना दुर्लक्षिले जाते…प्रसंगी काम झाल्यावर बाजूला केले जाते…त्यामुळे वरून सुंदर दिसणारे गुलाब खिशात ठेवता ठेवता…कधी गुलाबाच्या अंगात असणारे काटे हृदयाला टोचतात तेच समजत नाही …जेव्हा रक्त वाहते तेव्हा वेळ निघून गेलेली असते…लोकांनी मार्ग बदललेला असतो…जिवापेक्षा जास्त प्रिय असणारी आपल्यावर प्रेम करणारी माणसे आपल्याच चुकीच्या स्वभावामुळे दुरावतात…आणि नको ती मात्र शेला धरून राहतात…डाग लावण्यासाठी…
काहीशी अशीच परिस्थिती झाली आहे सावंतवाडीचे आमदार माजी मंत्री दीपक केसरकर यांची… दीपक केसरकर यांच्या अवतीभवती आज कोण असतात? हा खरोखरच चिंतनीय विषय आहे. शिवसेना पक्षाचेच नव्हे तर दीपक केसरकर यांच्यावर प्रेम करणारे जे प्रामाणिक कार्यकर्ते असतात ते निवडणुकीत केसरकरांना प्रामाणिकपणे साथ देतात…प्रसंगी स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून पक्षासाठी, केसरकरांसाठी काम करतात आणि निवडून आल्यावर ज्यांनी घाम गाळला ते लोक केसरकरांकडे गेले असता त्यांच्याकडे बघून न बघितल्यासारखे केले जाते….आणि संधीसाधू, लाळघोटे केसरकर निवडून आल्यावर गुलाल उधळत आपल्या भविष्याची सोय करण्यासाठी मागेपुढे करतात ते मात्र पाठीराखे म्हणून केसरकर सोबत ठेवतात…केसरकरांच्या याच स्वभावामुळे निष्ठा असलेले अनेक प्रामाणिक लोक आज दूर गेले…आपण भले आणि आपले काम म्हणत घरी बसले.
गावात संघटना बांधणारा केसरकरांवर प्रेम करणारा कार्यकर्ता दहा जणांना घेऊन केसरकरांकडे गेला की, केसरकर दहा जणांच्या हृदयात आपले स्थान निर्माण करतात पण ज्याने दहा जणांना आणले त्या प्रामाणिक जवळच्या कार्यकर्त्यांस मात्र विसरतात…बाजूला करतात. त्यामुळे असे अनेक प्रामाणिक कार्यकर्ते तुटले…आणि अनैतिक गैरधंदे करणारे मात्र आमचे भाई म्हणत कार्यालयात आमदार असल्यासारखेच वावरू लागले. केसरकर कार्यालयात नसताना त्यांच्या कार्यालयात हेच संधीसाधू आमदार असतात आणि रस्त्यावर गैरधंदे करताना तर पक्षाचे वजनदार नेते म्हणून वावरतात. राजकीय बुरखा घालून गैरधंदे करणारे कधी प्रविणभाई, कधी दीपक भाई, कधी शैलेश भाई अशी प्रत्येकाची बोटे धरत खासदारांच्या मर्जीतले होतात त्यातूनच गैरधंदे करण्याचे बळ मिळते, पक्षीय ताकदीच्या, आमदार, खासदारांच्या बळावर राजरोसपणे दारू वाहतूक, विक्री, वितरणासारखे गैरधंदे करण्याची हिंमत मिळते, राजकीय बुरख्याच्या आडून बक्कळ पैसा जमा केला जातो..परंतु वेळ रोजच सारखी नसते…गैरधंदे करणारेच त्यांची टीप देतात आणि सभ्यतेचा बुरखा फाटून सभ्य कार्यकर्त्यांचा खरा चेहरा जनतेच्या समोर येतो…रुमाल टाकून झाकलेले चेहरे….झाकून राहत नाहीत…टोपली खाली झाकलेला कोंबडा आरवायचं सोडत नाही….आग लागली की धूर लपून राहत नाही….२ नंबर केल्यावर…पाण्यावर तरंगल्याशिवाय राहत नाही…तसाच गैरधंदे करणारा कितीही शिकलेला उच्चशिक्षित असला तरी…स्वतःला..नेता कार्यकर्ता समजला तरी…गुन्हेगारी पार्श्वभूमी खरे रूप दाखवून खोट्याला उघडे पाडते…
राजकीय पदांचा वापर करून…आमदार केसरकर, खासदार आदींच्या जवळीकतेचा वापर करून…ऑफिसमध्ये दिवसभर नाश्ता चहा ढोसून…राजकीय बुरख्याच्या आडून गैरधंदे करणाऱ्यांना केसरकरांनी आत्ताच ओळखले पाहिजे…अन्यथा भविष्यात असे संधीसाधू कार्यकर्ते जपून प्रामाणिक कार्यकर्त्यांचा विश्वासघात झाला तर….संधीसाधू पाखरे दाणे खाऊन जातील….आणि रिकामी कणसे हाती येतील…
वेळ आहे तोपर्यंत आमदार दीपक केसरकर यांनी यावर विचार करावा….आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांचा सन्मान करून जपणूक करावी…कारण निवडणुकीत प्रामाणिक माणसांवरच लोक विश्वास ठेवतात…. संधीसाधूंवर नाही…

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + two =