You are currently viewing पुरुष

पुरुष

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पुरुष…*

 

केवळ पुरुषत्वाच्या व्याख्येपलीकडचा

एक अनाम चेहरा…

 

पुरुष म्हणजे नेमकं काय असतं?

केवळ रुंद छाती, उंच बांधा,

की,

नात्यांच्या ओझ्याखाली स्वतःचे अस्तित्व

विसरणारा एखादा खांदा?..

 

तोही असतो कधी आतून

कोसळलेला,

पण चेहऱ्यावर

चढवतो मुखवटा,

डोळ्यांत दाटलेला पाऊस

ओठांवर लपवून

ऋतू फुलवतो हसण्याचा..

 

त्याच्या वाट्याला आलेली

असते जबाबदाऱ्यांची न

संपणारी शर्यत!

हरवून बसतो तो स्वतःचीच

ओळख

दाबून ठेवताना स्वप्नांना

मुठीत…

 

त्याला शिकवले जाते

लहानपणापासूनच,

‘पुरुष कधी रडत नसतात!’

मग भावनांचे काय करायचे

त्याने?

त्या तर माणूस असल्याच्या

खुणा असतात!..

 

तो कधी वडिलांच्या रूपात

घरासाठी आभाळ पांघरतो,

कधी भावाच्या रूपात

बहिणीच्या स्वप्नांना

बळ देत राहतो..

 

कधी पती म्हणून सहप्रवासात

अर्धे आभाळ सोबतीला घेतो,

तर कधी मुलाच्या रूपात

आईच्या डोळ्यांतले जग

जपतो…

 

पण या सगळ्या

भूमिकांपलीकडे त्याचाही

एक स्वतंत्र चेहरा असतो,

कुणीतरी न विचारलेला प्रश्न,

कुणालाच न सांगितलेला

हुंदका असतो…

 

पुरुष असणे म्हणजे श्रेष्ठ

असणे नव्हे

ना स्त्रीपेक्षा वेगळे सामर्थ्य

मिरवणे,

तर माणुसकीच्या मातीमध्ये

संवेदनांचे बीज रुजवत

जगणे..

 

जो स्त्रीच्या अस्तित्वाला

सन्मान देतो,

जो अहंकारापेक्षा नात्यांना

जपतो,

जो सामर्थ्याचा अर्थ वर्चस्वात

नव्हे,

तर समतेच्या हातात शोधतो

तोच खऱ्या अर्थाने पुरुष

असतो!..

 

कारण पुरुषत्व देहात नसते

ते असते विचारांच्या

प्रगल्भतेत,

आणि माणूसपणाचे खरे

सौंदर्य असते

संवेदनांच्या श्रीमंतीत!

 

प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®

प्रतिक्रिया व्यक्त करा