बाळकृष्णने पटकावला २२ वा क्रमांक; ग्रँडमास्टरसह देशभरातील दिग्गज खेळाडूंचा सहभाग
सावंतवाडी : तिसवाडी बुद्धिबळ असोसिएशनच्या वतीने पणजी (गोवा) येथे आयोजित करण्यात आलेल्या एक लाख रुपये पारितोषिकांच्या राष्ट्रीय ब्लिट्झ रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत सावंतवाडीच्या बाळकृष्ण पेडणेकर याने उत्कृष्ट कामगिरी करत २२ वा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत एका ग्रँडमास्टरसह चार इंटरनॅशनल मास्टर्स आणि देशभरातील जवळपास २०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुक्ताई ॲकेडमीचे आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर, हर्ष राऊळ, चिदानंद रेडकर, पुष्कर केळूसकर आणि अथर्व वेंगुर्लेकर यांनी या स्पर्धेत सहभाग घेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
या स्पर्धेत बाळकृष्ण पेडणेकर याला ग्रँडमास्टर रॉय सप्तर्षी चौधरी यांच्याविरुद्ध टॉप टेबलवर खेळण्याची संधी मिळाली. अकरा फेऱ्यांच्या या स्पर्धेत बाळकृष्णने सहा फेऱ्यांमध्ये विजय मिळवला, तर तीन फेऱ्या बरोबरीत सोडवत साडेसात गुणांची कमाई केली. या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याने २२ वा क्रमांक मिळवला. तसेच आपल्या बुद्धिबळ रेटिंग गुणांमध्येही वाढ केली. उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
पुष्कर केळूसकर याने तब्बल सहा आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूंवर विजय मिळवत सहा गुणांची कमाई केली आणि ब्लिट्झ रेटिंगही मिळवले. अथर्व वेंगुर्लेकर याने सहा गुण, हर्ष राऊळ याने साडेपाच गुण, तर चिदानंद रेडकर याने पाच गुण मिळवले.
मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक श्री. कौस्तुभ पेडणेकर आणि सचिव सौ. स्नेहा पेडणेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच आगामी स्पर्धांसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल बुद्धिबळ क्षेत्रासह सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.
