You are currently viewing विचारांवर ठाम राहिल्यास अपेक्षित फलप्राप्ती! – अमृता चांदोरकर

विचारांवर ठाम राहिल्यास अपेक्षित फलप्राप्ती! – अमृता चांदोरकर

*विचारांवर ठाम राहिल्यास अपेक्षित फलप्राप्ती! – अमृता चांदोरकर*

*जिजाऊ व्याख्यानमाला – पुष्प पहिले*

पिंपरी

‘आपल्या विचारांवर ठाम राहिल्यास अपेक्षित फलप्राप्ती निश्चित होते!’ असे प्रतिपादन समुपदेशिका अमृता चांदोरकर यांनी चापेकर स्मारक उद्यान, चापेकर चौक, चिंचवडगाव येथे रविवार, दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि अनंत नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ‘जे मागाल ते मिळेल : अर्थात मनातील लहरी कशा काम करतात…’ या विषयावरील पहिले पुष्प गुंफताना अमृता चांदोरकर बोलत होत्या. उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते छत्तिसाव्या वर्षात पदार्पण करीत असलेल्या पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रभावती इंदलकर यांची व्यासपीठावर; तसेच राजाभाऊ गोलांडे, विपुल नेवाळे, सुहास पोफळे, महेश गावडे, नवनाथ सरडे, धीरज गुत्ते यांची श्रोत्यांमध्ये
प्रमुख उपस्थिती होती. शर्मिला बाबर यांनी, ‘महिलांना व्यासपीठ मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य गांधीपेठ तालीम मित्रमंडळ जिजाऊ व्याख्यानमालेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने करीत आहे!’ असे गौरवोद्गार काढले. डॉ. सिद्धी नेवाळे यांनी प्रास्ताविकातून मंडळाने सलग ७७ महिने आयोजित केलेल्या ‘मन करा रे प्रसन्न!’ या प्रवचनमालिकेची तसेच पस्तीस वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेल्या जिजाऊ व्याख्यानमालेची माहिती दिली. सुजाता पोफळे यांनी व्याख्यात्या चांदोरकर यांचा परिचय करून दिला. यावेळी सर्व उपस्थितांना ‘विनाऔषध – विनास्पर्श स्वयंपूर्ण उपचार’ या पुस्तकाचे विनामूल्य वितरण करण्यात आले.

अमृता चांदोरकर पुढे म्हणाल्या की, ‘आपण आपल्या चुकीच्या कृतीसाठी दुसर्‍यावर दोषारोप करतो. त्यामुळे कोणतीही भावना व्यक्त करताना किंवा कृती करताना विचारपूर्वक करा. आपण मनात जे विचार करतो, त्याप्रमाणे आपल्या सभोवती तशी कंपने निर्माण होतात. आपल्या विचारातून जी मागणी व्यक्त होते, त्याला हे विश्व ‘तथास्तू’ म्हणत आशीर्वाद देत असते. परमेश्वर हा चराचरात आहे, तसा तो आपल्या अंतरंगातही आहे. त्यामुळे आपले विचार आणि मागण्या यांची कंपने प्राणमय अन् मनोमय कोशात संग्रहित होतात. त्यामुळेच आपल्याला नक्की काय हवे आहे, हे उद्दिष्ट निश्चित करा. त्यानंतर ते तपासून बघा. सातत्याने आपल्या उद्दिष्टांची उजळणी करा. उद्दिष्ट साध्य झाले आहे, असे कल्पनाचित्र मनात साकार करा. जरी काही नकारात्मक गोष्टी घडल्यातरी उद्दिष्टांपासून ढळू नका. वेळोवेळी स्वतःला दुरुस्त करा. संयम ठेवा आणि फलप्राप्ती उशिरा झालीतरी आपल्या आराध्यदैवताचे धन्यवाद माना. या प्रवासात असे लक्षात येते की, कालांतराने जे जे हवे ते ते आपल्याला मिळत जाते!’ विविध उदाहरणे आणि संदर्भ उद्धृत करीत चांदोरकर यांनी विषयाची मांडणी केली. श्रोत्यांनी विचारलेल्या शंकांचे त्यांनी निरसन केले आणि व्याख्यानाचा समारोप सामुदायिक ध्यानधारणेच्या प्रात्यक्षिकाने केला. सुनीता वडगावकर यांनी सूत्रसंचालन केले. हेमा सायकर यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा