*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी ॲड संजय माकोणे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*दुष्काळी झळा*
पाऊस नाही पाणी नाही
पडल्या दुष्काळी झळा,
बळीराजाचा औंदा मात्र
कोरडाच गेला पोळा.
भेगा पडल्या धरणीला
चेहरेही सुकून गेले,
स्वप्न पाहिलेले सगळे जणू
पुरात वाहून गेले.
भर पावसाळ्यात आज
रस्त्यात उधळली धूळ,
नदीकाठच्या बाभळीचेहि
उघडे पडले मूळ.
डोंगर माथेही ओस पडले
गुरांना पुरेना चारा,
सकाळी सकाळीच आज कसा
उन्हाचा वाढलाय पारा.
गाडी गेली सुसाट आज
कोरडी पडली ओढी,
कर्जाच्या त्या खाईमध्ये
नकळत पडली उडी.
बांदावरच्या वेलीनीही
खाली टाकल्या माना,
बोलता बोलता बाजारात
खिशाचा मोडला कना.
येरे येरे पावसा म्हणून
देवालाही नवस केला,
निसर्ग जपताने मानव मात्र
त्यालाच विसरून गेला.
✍️ अँड.संजय माकोणे,अमळनेरकर
