You are currently viewing जि.प.ची अटलबिहारी वाजपेयी शाळा, चराठे नं.१ जमीन हस्तांतरणाच्या प्रतीक्षेत..

जि.प.ची अटलबिहारी वाजपेयी शाळा, चराठे नं.१ जमीन हस्तांतरणाच्या प्रतीक्षेत..

संपादकीय….

जिल्हा परिषदेची शाळा म्हटल्यावर लोकांच्या तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. गावातील मुले, गावातील लोक, शाळेची जुनी इमारत, आणि जि.प.चे शिक्षक म्हणजे कमी दर्जाचे शिक्षण असाच काहीसा लोकांचा समज झालेला आहे. खरं पाहता जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक हे दर्जेदार प्रशिक्षण घेऊनच आलेले असतात, त्यांच्या मध्ये शिकविण्याबाबत योग्य कला अवगत केलेली असते. त्यामुळे उपलब्ध साधनसामुग्रीतून चांगल्या दर्जाचे शिक्षण ते मुलांना देत असतात. परंतु प्रायव्हेट शाळांमध्ये वशीलबाजीने कमी पगारात आणि ज्यांना शासनाची नोकरी मिळत नाही किव्हा योग्य ते शिक्षण न घेतलेले सुद्धा शिक्षक म्हणून भरती केले जातात. असे असतानाही आपला स्टेटस ह्या गोंडस शब्दासाठी कितीतरी लोक आपल्या मुलांना भरमसाट फी भरून प्रायव्हेट शाळांमध्ये दाखल करतात. कदाचित कुणालाही माहिती नसेल सावंतवाडीत नोकरीनिमित्त असलेले श्री.व सौ. पोरे यांचा मुलगा डॉ मुकुल भास्कर पोरे हा जिल्हा परिषदेच्या उसप शाळेचा विद्यार्थी “विष विज्ञानचा” भारतातील पहिला शास्त्रज्ञ झाला. असे अनेक विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेतून घडले आहेत.


सावंतवाडी ही चराठे गावची एक वाडी. याच चराठे गावात चराठे शाळा नं.१ ही जि प ची शाळा. युती शासनाच्या काळात २०१८/१९ मध्ये या शाळेला “ओजस आंतरराष्ट्रीय शाळा” हा दर्जा देण्यात आला. मूल्यांकनात महाराष्ट्रात शाळा तिसरी आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वर्षा देसाई, इतर शिक्षक वर्ग, गावचे सरपंच रघुनाथ वाळके, त्यांचे इतर सहकारी, गावकरी, शाळा व्य. स. अध्यक्ष महेंद्र पटेकर, सर्व पालक यांच्या मेहनतीने शाळा बदलण्यास सुरुवात झाली. वर्ग खोल्याना, शाळेच्या भिंतींना रंग चढले, स्टेज तयार झाले. हे सर्व लोक वर्गणीतून होत होते. कलरकॉन कंपनीकडून शाळेला भरीव हातभार लाभून शाळेसाठी २२ कॉम्प्युटर आले. कॉम्प्युटर खोली एसी झाली, प्रत्येक वर्गात एलईडी बसवल्या. ४०० ते ५०० प्रयोग असलेलं विज्ञान केंद्र शासनाच्या उपक्रमातून सुरू झाले. शाळा डिजिटल झाली. मुख्याध्यापिका सौ वर्षा देसाई आणि इतर शिक्षक वृंदाच्या सहकार्यातून शाळा उंच भरारी घेऊ लागली. सावंतवाडी शहरात मोठमोठ्या शाळांमध्ये शिकणारी मुले शहरातून चराठे शाळेमध्ये प्रवेश घेऊ लागली. शाळेची पटसंख्या ७० वरून २०० झाली. वर्गात फक्त ३२ मुलेच असल्याने मुलांना शिक्षण घेणेही सहज झाले. प्रशिक्षित शिक्षक वर्ग, व मुख्याध्यापिका वर्षा देसाई, यांना स्कॉलरशिप बोर्ड वर १२ वर्षे असल्याने तो ही दांडगा अनुभव. सौ गावडे सौ निरवडेकर, सौ पेडणेकर, सौ सावंत, सौ शिंदे इत्यादी शिक्षिका, श्री कोळी, श्री कोरगावकर यांच्या सारख्या शिक्षकांमुळे शाळा प्रगतीपथावर आहे.
मध्यंतरी राज्यातील सरकार बदल झाला आणि मागील सरकारने दिलेला या शाळांचा आंतरराष्ट्रीय दर्जा सध्याच्या सरकारने काढून घेतला व समान शिक्षण धोरण अवलंबिले. महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातून प्रत्येक तालुक्यातील एक याप्रमाणे एकूण ४८१ आदर्श शाळा निवडल्या आहेत, त्यात सावंतवाडी तालुक्यातून अटलबिहारी वाजपेयी शाळा चराठे नं १ ची निवड झालेली आहे. या शाळांना प्रशिक्षित शिक्षक वर्ग शिकवणार असल्याने तालुक्यातील इतर शाळा देखील यांच्याच शिक्षण पद्धतींचा अवलंब करणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे पालकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. आज अटलबिहारी वाजपेयी चराठे शाळा नं १ कडे सर्व सुविधा आहेत, डिजिटल वर्गखोली, प्रशिक्षण शिक्षकवृंद, शाळेकडे तीन एकर जमीन. परंतु ही तीन एकर जमीन देवस्थान कमिटीच्या नावे आहे. देवस्थान कमिटीला ग्रामस्थांनी स्वतःच्या मालकीची करोडो रुपयांची दुसरी तीन एकर जागा दिलेली आहे. परंतु मंत्रालयात या तीन एकर जमिनीच्या हस्तांतरणाचा प्रश्न गेली दोन वर्षे पडून आहे.
आमदार दीपक केसरकर यांनी हे काम पालकमंत्री असताना करून देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्यांच्या प्रयत्नांतून ते अजून पर्यंत तरी शक्य झालेले नाही. त्यामुळे पुढील सुविधा निर्माण करण्यात अनंत अडचणी येत आहेत. पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, यांनी व्यक्तिशः लक्ष घालून शाळेच्या नावे जमीन हस्तांतरणाचे हे काम लवकरात लवकर करून घ्यावे अशी चराठे गावकरी, शिक्षक व पालकांची मागणी आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 1 =