पेन्शनरांचा आधारस्तंभ… “श्री. एम. डी. जोशी”

♦असं म्हणतात की, ‘अडचणींच्या वेळी जो धावून येतो तो देवा सारखा असतो’ असाच एक देवमाणूस जो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम पेन्शनरांचा अडीअडचणीला धावून जातो तो म्हणजे, ‘एम डी जोशी’..

♦आजकाल घरातील रक्ताच्या नात्यांच्या माणसांच्या अडचणींना उपयोगी पडणारी माणसे सुद्धा शोधावी लागतील अशी परिस्थिती असताना श्री.जोशी हे जिल्ह्यातील कित्येक पेन्शनरांसाठी, त्यांच्या पश्चात त्यांच्या वारसांसाठी एक हक्काचे स्थान बनून राहिलेत, जणू काय पेन्शनरांचा ‘हक्काचा माणूस’.

♦सरकारी नोकरी संपवून आयुष्यातील उर्वरित वर्षे सुखासमाधानाने जागण्याचं स्वप्न उराशी घेऊन कित्येकजण रिटायर्ड होतात. प्रत्येकाला आस असते रिटायर्ड झाल्यावर फंड असो वा पेन्शन सहजपणे मिळेल, आणि आपलं उर्वरित आयुष्य आनंदात जाईल.
परंतु बऱ्याच जणांना त्यात वाईट अनुभव येतात, कित्येकांची पेन्शन सुरूच होत नाही, काहींची मध्येच बंद होते, वेगवेगळ्या अडचणी निर्माण होतात. काहीवेळा आपल्याच हक्काच्या पैशांसाठी कोर्टाची पायरी देखील चढावी लागते.

♦अशा अडचणीच्यावेळी गरज असते ती भक्कम आधाराची, पाठिंब्याची. ‘घाबरू नकोस, मी आहे’ असं म्हणणाऱ्या व्यक्तीची. आणि असाच आधार देऊन पेन्शनरांच्या न्याय्यहक्कांसाठी लढा द्यायला सदैव तत्पर असणारी व्यक्ती म्हणजे
‘एम डी जोशी’.

♦गेली 15 वर्षे ते पेन्शनरांना त्यांच्या विविध हक्काची जाणीव करून देत त्यांच्या हक्कासाठी अहोरात्र निरंतरपणे काम करत आहेत, पेन्शनरांना लाभ मिळवून देण्यासाठी झटत आहेत. एखाद्या पेंशनराचं निधन झाल्यास त्यांचे वारस, कुटुंब पेन्शन पासून वंचित राहू नयेत म्हणून गरज भासल्यास पेन्शन केस तयार करून, शासनस्तरावर प्रयत्न करून ते पेन्शनरांच्या वारसांना आर्थिक लाभ मिळवून देतात, त्यांचा हक्क मिळवून देतात.

♦आतापर्यंत शेकडो लोकांना करोडो रुपये मिळवून देण्यात जोशींचा सिंहाचा वाटा आहे. ज्यांनी कधी आपली पेन्शन आपल्याला मिळेल याची आशाही सोडलेली त्यांनासुद्धा जोशींनी निराशेच्या गर्तेतून बाहेर काढत आशावादी जीवन जगण्यास सक्षम बनविले आहे.

♦असा लाभ मिळवून दिलेल्या कित्येक लोकांनी संस्थेला हजारो रुपयांची देणगी दिलेली आहे, त्याच देणगीतून संस्थेने मालवण देऊळवाडा येथे पेन्शनरांचा कल्याणासाठी एखादी हक्काची जागा असावी म्हणून एक कार्यालय थाटलेलं आहे, जिथून अनेक गरजू पेन्शनरांचे प्रश्न योग्य तिथे मांडून सोडविले जातात.
कित्येक लोक रिटायर्ड झाल्यावर ऐशआरामात जगण्यात धन्यता मानतात परंतु श्री जोशी हे वयाच्या 75 व्या वर्षीही पेन्शनरांसाठी विलक्षण ऊर्जेने कार्य करताना दिसतात.

♦पेन्शनर असोसिएशनच्या माध्यमातून अनेक पेन्शनरांच्या विधवा भगिनींचे, कुटुंबाचे प्रश्न सोडवून त्यांना आधार दिल्यामुळे एम डी जोशी हे प्रत्येक पेन्शनरांना आपल्याचं कुटुंबातील सदस्य असल्या सारखे वाटतात.

♦खोल समुद्रात वादळात सापडलेल्या, भरकटलेल्या नौकेला सुद्धा दूर टेकडीवर लुकलूकणारा दिवा सुद्धा आधार वाटतो, आणि नावाड्या त्या दिशेने नौका हाकण्याचा प्रयत्न करतो, परंतु जवळ आल्यावर त्याच्या लक्षात येतं की, आपल्याला दिशा दाखविण्यासाठीच तो दीपस्तंभ उभारलेला होता….

♦त्याच प्रमाणे अडचणीत सापडलेल्या पेन्शनरांसाठी सुद्धा श्री. एम. डी. जोशी हे “दिपस्तंभ” आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा