You are currently viewing एसटीच्या विद्यार्थी पाससाठी आता NCMC कार्ड अनिवार्य!

एसटीच्या विद्यार्थी पाससाठी आता NCMC कार्ड अनिवार्य!

एसटीच्या विद्यार्थी पाससाठी आता NCMC कार्ड अनिवार्य!

सरल किंवा APAAR क्रमांक आधारशी लिंक असणे आवश्यक; लवकरच नोंदणीला सुरुवात

कणकवली :

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सवलतीच्या प्रवासी पाससाठी RuPay ON THE GO, NCMC Enabled कार्ड लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील सर्व एसटी आगारांमध्ये नोंदणी व वितरण प्रक्रिया राबविण्यात येणार असून, लवकरच विद्यार्थ्यांच्या NCMC कार्ड नोंदणीला सुरुवात होणार आहे.
एसटी महामंडळाकडून विविध सवलतधारक तसेच विनासवलतधारक प्रवाशांसाठी NCMC Enabled कार्ड योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची अंमलबजावणी, देखभाल व वितरणाचे काम एसटी महामंडळ, ईक्वस टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि NSDL पेमेंट्स बँक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. सध्या राज्यातील सर्व आगारांमध्ये कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू आहे.
१६ फेब्रुवारी २०२६ पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारक प्रवाशांच्या NCMC कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर आता विद्यार्थ्यांसाठीही ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
महामंडळाच्या माहितीनुसार, शालेय तसेच तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सरल (SARAL) किंवा APAAR क्रमांकाशी संलग्न NCMC Enabled कार्ड देण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांचा सरल किंवा APAAR क्रमांक आधार क्रमांकाशी जोडलेला असणे बंधनकारक राहणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी मासिक पासचा अर्ज एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे. अर्जातील माहिती व आवश्यक कागदपत्रे शाळेच्या मुख्याध्यापकांकडून प्रमाणित करून संबंधित आगारातील वाहतूक नियंत्रक किंवा अधिकृत एजंटकडे सादर करावी लागतील. पडताळणीनंतर विद्यार्थ्यांची NCMC कार्ड नोंदणी करण्यात येणार आहे.
नोंदणीसाठी विद्यार्थी किंवा पालकांचा मोबाईल क्रमांक देणे आवश्यक राहणार असून, शुल्क भरल्यानंतर पावती दिली जाईल. नोंदणीनंतर सुमारे ३० दिवसांत कार्ड तयार होऊन संबंधित आगारात उपलब्ध होईल. त्यानंतर POS मशीनद्वारे कार्ड सक्रिय करून विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी NCMC कार्डसाठी आवश्यक बाबी
सरल (SARAL) किंवा APAAR क्रमांक आवश्यक
संबंधित क्रमांक आधारशी संलग्न असणे बंधनकारक
शाळेच्या मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र आवश्यक
विद्यार्थी किंवा पालकांचा मोबाईल क्रमांक अनिवार्य
अर्ज एसटीच्या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध
नोंदणीनंतर सुमारे ३० दिवसांत कार्ड उपलब्ध
POS मशीनद्वारे कार्ड सक्रिय करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा