नियमित पीककर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात २ टक्के व्याज रिबेट थेट जमा; बँकेच्या नफ्यातून दिलासा
सिंधुदुर्गनगरी :
हवामानातील सततच्या बदलांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मोठा दिलासा दिला आहे. बँकेने दिलेल्या आश्वासनानुसार पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ टक्के व्याज सवलतीपोटी (रिबेट) एकूण ₹१ कोटी ९० लाखांची रक्कम थेट त्यांच्या बचत खात्यात जमा करण्यात आली आहे. ऐन शेती हंगामात ही मदत मिळाल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी काही अंशी नवचैतन्य मिळेल, अशी अपेक्षा जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त केली.
सन २०२५-२६ या वर्षात अवकाळी पाऊस, चक्रीवादळ, धुके, खार आणि दव पडणे अशा विविध नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा व काजू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांनी लागवड व बागांच्या देखभालीसाठी केलेला उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आणि त्यांची आर्थिक स्थिती कोलमडली. ही परिस्थिती लक्षात घेऊन विविध कार्यकारी विकास संस्थांमार्फत तसेच बँकेकडून थेट पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या कर्जावरील व्याजदरात २ टक्के व्याज सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा बँकेने घेतला होता.
या निर्णयानुसार ३० जून २०२६ अखेरपर्यंत आपल्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या ७ हजार ३१० सभासद शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळाला असून त्यांच्या खात्यावर ₹१ कोटी ९० लाख जमा करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, ही आर्थिक मदत बँकेने स्वतःच्या नफ्यातून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे.
ऐन शेतीच्या कामांच्या काळात हक्काची ही रक्कम मिळाल्याने जिल्ह्यातील आंबा-काजू बागायतदारांना मोठा आधार मिळाला असून, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनीही या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
