सिंधुदुर्ग :
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रभर ५०० हून अधिक ठिकाणी ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ अंतर्गत रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील युवकांना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ११ ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले आहे.
‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ हा उपक्रम राज्यातील जिल्हा, तालुका तसेच औद्योगिक परिसरांमध्ये राबविण्यात येत आहे. या माध्यमातून विविध नामांकित कंपन्या व आस्थापनांमार्फत विविध पदांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या ११ रोजगार मेळाव्यांमध्ये आतापर्यंत ८६ उद्योजक व कंपन्यांनी एकूण १ हजार ६१६ रिक्त पदे अधिसूचित केली आहेत. त्यामुळे स्थानिक युवक-युवतींना रोजगाराच्या दृष्टीने मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
सावंतवाडी येथील टोपीवाला स्मारक तंत्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालयात ८ कंपन्यांमार्फत १२८ पदे, कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात १३ कंपन्यांमार्फत २५७ पदे, दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे ८ कंपन्यांमार्फत १७० पदे आणि वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी येथील अनगरसिद्ध खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ८ कंपन्यांमार्फत ६० पदे उपलब्ध आहेत.
सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे १० कंपन्यांमार्फत २९३ पदे, फोंडाघाट येथील आर्टस अँड कॉमर्स कॉलेज येथे ८ कंपन्यांमार्फत ८६ पदे, कणकवली येथील एस.एस.पी.एम. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे ६ कंपन्यांमार्फत १३३ पदे, तर वाडी हुमरमळा (डिगस) येथील श्री. पुष्पसेन सावंत कृषी/फार्मसी/नर्सिंग महाविद्यालयात २ कंपन्यांमार्फत ४४ पदे उपलब्ध आहेत.
याशिवाय मालवण येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ८ कंपन्यांमार्फत १३६ पदे, देवगड येथील श्री. स. ह. केळकर महाविद्यालयात ८ कंपन्यांमार्फत ८७ पदे आणि वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ प्रक्रिया संशोधन केंद्रात ६ कंपन्यांमार्फत २२२ पदे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अशा प्रकारे जिल्ह्यातील ११ केंद्रांवर एकूण ८६ कंपन्या सहभागी होणार असून १ हजार ६१६ रिक्त पदांसाठी उमेदवारांना संधी मिळणार आहे.
जिल्ह्यातील स्थानिक तरुण-तरुणींनी रोजगार महाकुंभात सहभागी होण्यासाठी महा स्वयंम रोजगार https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index पोर्टलवर नोंदणी करावी. नोंदणी करून उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत व शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती प्रितेश राऊळ यांनी केले आहे.
तसेच जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती, पदाधिकारी व सदस्य तसेच स्वयंसेवी संस्थांनी आपल्या प्रभागातील जास्तीत जास्त स्थानिक युवक-युवती आणि सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना या रोजगार मेळाव्याची माहिती देऊन त्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध झालेल्या या संधीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा. रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन विविध कंपन्या व आस्थापनांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधत उपलब्ध रोजगाराच्या संधींची माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग येथे ०२३६२-२२८८३५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच sindhudurgrojgar या फेसबुक व इन्स्टाग्राम पेजला भेट द्यावी, असे कळविण्यात आले आहे.
