You are currently viewing जिल्हाधिकाऱ्यांकडून वेंगुर्ला तालुक्यात भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांकडून वेंगुर्ला तालुक्यात भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी

*पिकांची स्थिती, पाणीपातळी आणि पिण्याच्या पाण्याचा घेतला आढावा; आवश्यक उपाययोजनांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना*

 

वेंगुर्ला : भातपिकांच्या दाणे भरण्याच्या महत्त्वाच्या कालावधीत पावसाने ओढ दिल्यामुळे वेंगुर्ला तालुक्यातील काही भागात भातपिकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. पावसातील खंडामुळे फुटव्यांची संख्या कमी राहणे, लोंब्या कमी येणे, पिकांना आवश्यक वेळी पाणी न मिळणे आणि काही ठिकाणी पिके करपण्याच्या स्थितीत येणे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज वेंगुर्ला तालुक्यातील कुशेवाडा, रावदस, केसरकरवाडी आणि मळई परिसरातील शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला.

कुशेवाडा ग्रामपंचायत परिसरातील भातशेतीची पाहणी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून पिकांच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. भाताचे दाणे तयार होण्याच्या कालावधीत पाऊस कमी झाल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दरवर्षीच्या तुलनेत यंदा भाताला अपेक्षित फुटवे फुटले नाहीत तसेच लोंब्यांची संख्याही कमी राहिली आहे. गेल्या सुमारे १४ दिवसांपासून पाऊस नसल्याने पिकांना आवश्यक पाणी मिळाले नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी विहिरीची पाहणी करून पाणीपातळीची स्थिती जाणून घेतली. पावसाअभावी विहिरींच्या पाणीपातळीत झालेला बदल तसेच मागील वर्षीच्या तुलनेत यंदाची पाणीपातळी किती कमी झाली आहे, याच्या नोंदी घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शेतीसाठी पाण्याची उपलब्धता कमी होतानाच काही भागात पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सार्वजनिक तसेच खासगी पाणीपुरवठा स्रोतांची अद्ययावत माहिती संकलित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कुशेवाडा परिसरातील ओवळावरील बंधाऱ्याचीही जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.

*अल्प पावसाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आवश्यक*

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अल्प पर्जन्यमानाच्या परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण आणि वितरण प्रभावित झाल्याचे सांगण्यात आले. आगामी काळात परतीचा पाऊस किती आणि कधी पडेल, हे निश्चितपणे सांगता येत नसल्याने उपलब्ध पाणीसाठ्याचे संधारण, पाण्याचा काटकसरीने वापर आणि स्थानिक पातळीवरील जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन याला प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

 

*रावदस येथे प्रत्यक्ष अँपवर पिकाची नोंद*

कुशेवाडा ग्रामपंचायतीअंतर्गत रावदस येथे महिला शेतकऱ्यांच्या शेतातील भातपिकाचीही जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी एका शेतकऱ्याने पिकाची नोंदणी होत नसल्याची तसेच संबंधित अॅप कार्यरत नसल्याची अडचण जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर उपस्थित सर्व्हेयरने प्रत्यक्ष अॅपवर पिकाची नोंद करून दाखवली. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकऱ्यांना नोंदणी प्रक्रियेत अडचणी येऊ नयेत, यासाठी क्षेत्रीय पातळीवर आवश्यक सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यानंतर केसरकरवाडी येथे जिल्हाधिकाऱ्यांनी भातशेतीची पाहणी केली. अडीच महिन्यांच्या कालावधीचे बियाणे वापरलेल्या शेतातील पीक तुलनेने चांगले असल्याचे दिसून आले. मात्र साडेतीन महिन्यांच्या कालावधीचे बियाणे वापरलेल्या काही शेतांमध्ये पावसाअभावी पीक अपेक्षित अवस्थेत आले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पावसाचा खंड कायम राहिल्यास या पिकातून अपेक्षित उत्पादन मिळणार नसल्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

*जलतारा कामांना प्राधान्य; रोजगार हमीच्या कामांचा लाभ घेण्याचे आवाहन*

पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी जलतारा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त कामे घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्तरावरील यंत्रणेला दिल्या. रोजगार हमी योजनेअंतर्गत जलतारा साठी अकुशल कामासाठी पाच हजार रुपयांपर्यंतच्या तरतुदीचा लाभ घेत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेता येतील, असे त्यांनी सांगितले. या योजनेतूनही विविध प्रकारची कामे घेता येत असल्याने ग्रामसेवकांनी उपलब्ध योजनांचा प्रभावीपणे वापर करून गावांमध्ये आवश्यक कामे प्रस्तावित करावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

*मळई येथे पिक कापणी प्रयोगाच्या सूचना*

मळई गावातही जिल्हाधिकाऱ्यांनी भातशेतीची पाहणी केली. ज्या ठिकाणी भाताचे पीक भरलेले असून उत्पादनाची स्थिती तुलनेने चांगली आहे, अशा ठिकाणी पिक कापणी प्रयोग घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाला दिल्या. पाहणीदरम्यान एका शेतामध्ये सुमारे ७० टक्के भात भरलेला असल्याचे निदर्शनास आले. मात्र आता पाऊस न झाल्यास उर्वरित पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

पिके करपण्यापासून वाचविण्यासाठी कृषी विभागाने सुचविलेल्या औषधांचा वापर करूनही अपेक्षित परिणाम झाला नसल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. आता पाऊस झाला तरी काही पिकांपासून अपेक्षित उत्पादन मिळणार नसल्याची परिस्थिती असल्याचे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. परिसरातील पाणीपातळीतही घट झाल्याचे पाहणीदरम्यान स्पष्ट झाले.

*पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची माहिती संकलित करण्याचे निर्देश*

अल्प पावसामुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा स्रोत तसेच आवश्यकतेनुसार खासगी पाणी स्रोतांची माहिती संकलित करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. ज्या ठिकाणी भविष्यात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी आतापासूनच आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या पाहणीदरम्यान प्रांताधिकारी विरसिंग वसावे, तहसीलदार ओमकार ओतारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, लघु पाटबंधारे, जलसंधारण विभागाचे अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, सरपंच निलेश सामंत, जिल्हा परिषद सदस्य यज्ञा साळगावकर, पंचायत समिती उपसभापती सचिन देसाई, उपसरपंच महादेव सापळे तसेच ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा