*जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची जोड देण्याचे केले आवाहन*
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील नेमळे भागातील एरोंडकवाडी आणि इन्सुली ग्रामपंचायतीअंतर्गत क्षेत्रफळ येथे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी भातशेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. पावसातील खंड आणि त्यानंतरच्या वाढलेल्या उष्णतेमुळे भातपिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पाऊस नसल्यामुळे करपा नियंत्रणात आणणेही कठीण झाले असून, भाताच्या लोंब्यांमध्ये दाणे न भरता त्या पोचट म्हणजेच पोल राहिल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे यंदाच्या भात उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी परिसरातील ओवळचीही पाहणी केली. बंधाऱ्यावरील पाणी अडवून ते अधिक काळ उपलब्ध राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी विरसिंग वसावे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष शिरोडकर, उपअभियंता आशुतोष यादव, मध्यम पाटबंधारे विभाग आंबडपालचे अधिकारी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीमंगले, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश राणे यांच्यासह संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी, शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
*जलतारा कामाचा शुभारंभ, जलतारा बाबत गावागावांत विस्तार करण्याच्या सूचना*
पावसाचे उपलब्ध पाणी अडविणे, त्याचा साठा वाढविणे आणि भूजलपातळी टिकविण्यासाठी जलतारा यासारख्या उपाययोजना गावपातळीवर मोठ्या प्रमाणावर राबविण्याची गरज जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी व्यक्त केली. स्थानिक पातळीवर उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर करण्याबरोबरच पावसाचे पाणी अडविण्यासाठी लहान बंधारे, ओवळ व इतर जलस्रोतांवर आवश्यक कामे करावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. जलसंधारणाची कामे केवळ शासकीय यंत्रणेमार्फत न करता ग्रामस्थांच्या सहभागातूनही मोठ्या प्रमाणावर हाती घेता येतील. गावातील बंधारे तुंबविणे, पाण्याचा प्रवाह अडविणे आणि उपलब्ध पाणी अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी लोकसहभागातून कामे करण्याचे आवाहन त्यांनी केले. यापूर्वी अशा स्वरूपाची परिस्थिती क्वचितच निर्माण झाली असल्याने प्रशासनासोबत ग्रामस्थांनी एकत्र येऊन पाणी वाचविण्यासाठी काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर जलतारा कामाचा शुभारंभ त्याठिकाणी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपसभापती गौरव मुळीक, सरपंच दीपिका भैरे, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील उपलब्ध जलस्रोतांचा अधिकाधिक उपयोग करून पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी अशा कामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पुढे इन्सुली ग्रामपंचायतीअंतर्गत क्षेत्रफळ गावाला भेट देऊन भातशेती, ओवळ तसेच शेतकऱ्यांच्या विहिरींच्या पाणीपातळीची पाहणी केली. कमी पाऊस आणि वाढलेल्या उष्णतेमुळे भातपीक वाया जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पिकांना आवश्यक टप्प्यावर पाणी न मिळाल्याने उत्पादनावर परिणाम होत असल्याची माहिती त्यांनी दिली. या पार्श्वभूमीवर लघु पाटबंधारे, मृद व जलसंधारण तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना उपलब्ध जलस्रोतांचे बळकटीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. स्रोत बळकटीकरण, नाला बांधबांधिस्ती, पाणलोट क्षेत्रातील आवश्यक कामे तसेच लोकसहभागातून स्थानिक पातळीवर बांध घालून पाणी अडविणे यासारख्या उपाययोजनांना प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
