You are currently viewing सावंतवाडीत नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; रस्त्यांवरील खड्डे व ढासळलेली आरोग्य व्यवस्था यावर संजय परांजपे यांचा संताप

सावंतवाडीत नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; रस्त्यांवरील खड्डे व ढासळलेली आरोग्य व्यवस्था यावर संजय परांजपे यांचा संताप

सावंतवाडीत नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; रस्त्यांवरील खड्डे व ढासळलेली आरोग्य व्यवस्था यावर संजय परांजपे यांचा संताप

खड्ड्यात दुचाकी घसरून अभियंता संजय परांजपे जखमी; उपजिल्हा रुग्णालयातील उपचारांवर प्रश्नचिन्ह, लोकप्रतिनिधी व प्रशासनावर टीका

सावंतवाडी :

सावंतवाडी शहरात रस्त्यांवरील वाढते खड्डे आणि आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत असल्याची खंत खासकीलवाडा येथील रहिवासी अभियंता संजय परांजपे यांनी व्यक्त केली आहे. शहर दिवसेंदिवस नागरिकांसाठी असुरक्षित बनत चालल्याची भीती त्यांनी बोलून दाखवली.
शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे सोमवारी सायंकाळी परांजपे यांची दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात त्यांच्या उजव्या हाताचे हाड मोडले असून डोक्यालाही गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारासाठी जवळपास एक तास प्रतीक्षा करावी लागल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यानंतर डोक्यावरील जखमेवर टाके घालून एक्स-रे करण्यात आला. ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. अवधूत यांनी पुढील उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. मात्र, तेथील परिस्थितीचा विचार करून परांजपे यांनी खासगी रुग्णालयात दाखल होऊन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी त्यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील उपचार व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत, “येथील डॉक्टरांचे काम रुग्णांना जिल्हा रुग्णालय किंवा बांबुळी येथे रेफर करणे एवढेच उरले आहे का?” असा सवाल केला.
नगरपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टक्केवारीच्या मुद्द्यावर वाद सुरू असताना नागरिक मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याची टीकाही त्यांनी केली. शहरातील ठिकठिकाणी पडलेले खड्डे अपघातांना कारणीभूत ठरत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
मागील दोन वर्षांत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरातील अनेक खड्डे सिमेंट काँक्रीटने बुजविण्यात आल्याचे कौतुक करत, आता निवडून आलेले लोकप्रतिनिधी नेमके काय करत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव, लक्ष्मण कदम आणि रूपा मुद्राळे यांनी खासगी रुग्णालयात जाऊन संजय परांजपे यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी परांजपे यांनी त्यांच्या भेटीबद्दल आभार व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा