You are currently viewing स्वाधार योजनेसाठी अर्ज नूतनीकरणाची अंतिम मुदत १५ सप्टेंबरपर्यंत

स्वाधार योजनेसाठी अर्ज नूतनीकरणाची अंतिम मुदत १५ सप्टेंबरपर्यंत

सिंधुदुर्गनगरी : समाज कल्याण विभागामार्फत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज नूतनीकरणाची (Renewal) अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात स्वाधार योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक वर्षासाठी आपला अर्ज https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने नूतनीकरण करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी विहित मुदतीपूर्वी म्हणजेच १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी.

अंतिम मुदतीनंतर अर्जामध्ये कोणताही बदल अथवा दुरुस्ती करता येणार नाही. तसेच, निर्धारित मुदतीत अर्ज नूतनीकरण न करणारे विद्यार्थी स्वाधार योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरतील. अंतिम मुदतीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे समाज कल्याण विभागाने स्पष्ट केले आहे.

अर्ज नूतनीकरण करताना विद्यार्थ्यांना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास त्यांनी अंतिम मुदतीपूर्वी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालयाशी दूरध्वनी क्रमांक ०२३६२-२२८८८२ वर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा