You are currently viewing आरोस बाजार दांडेली पुलावर पावसाचे पाणी

आरोस बाजार दांडेली पुलावर पावसाचे पाणी

*नारळ गोळा करण्यासाठी लोकांची गर्दी*

 

सावंतवाडी :

 

सावंतवाडी तालुक्यात काल मध्यरात्रीपासून पावसाने थैमान मांडले आहे. मध्यरात्री सुरू झालेला पाऊस आज दुपारपर्यंत जोरदार बरसात होता. पावसाने उसंत न घेतल्यामुळे सुरू झालेली शेतीची कामे खोळंबली. पावसाच्या या अक्राळविक्राळ रूपाने बळीराजा मात्र हैराण झाला. काल रात्रीपासून अचानक उग्ररूप धारण केलेल्या पावसाने सावंतवाडी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले. सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली मार्गे आरोस बाजार – कोंडुरा जाणाऱ्या मार्गावर दांडेली येथील पुलावर तब्बल दोन तास पाणी आल्यामुळे आरोस बाजारकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती. पावसाळ्यात जोरदार पाऊस होतो, तेव्हा दांडेली पुलावर प्रत्येकवेळी पाणी येते.

तीन वर्षांपूर्वी याच नदीवर असलेल्या मळेवाड – कोंडुरा मार्गावरील कोंडुरा येथे नवीन पूल बांधण्यात आले. परंतु नवीन पुलाचे बांधकाम करत असताना पुलाची उंची किरकोळ वाढवल्यामुळे कोंडुरा येथील पुलावर देखील दोन्ही बाजूला पाणी साचते. बांधकाम खात्याच्या हलगर्जी कारभारामुळे योग्य नियोजन न करता पूल बांधल्यामुळे ज्यावेळी मोठ्या प्रमाणात पाऊस होतो तेव्हा कोंडुरा पुलाच्या एका बाजूच्या सखल भागात गुडघाभर पाणी असते. याच नदीवर आरोस बाजार, दांडेली येथे जुना पूल असून न्हावेली आरोस बाजार, आरोस मार्गे गोवा येथे होणारी वाहतूक याच पुलावरून होते. न्हावेली मार्गे आरोस जाणारा रस्ता हा शॉर्टकट असल्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. पूर्वीच्या काळातील जुने असलेले दांडेली येथील पूल हे दोन्ही बाजूचे रस्ते उंच असूनही पूल मात्र खूपच सखल भागात आहे. त्यामुळे अगदी दोन-तीन तास जरी मुसळधार पाऊस झाला तर पुलावर मोठ्या प्रमाणावर पाणी येते आणि शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांना अडकून पडावे लागते. या पुलावर पाणी आल्यानंतर एकीकडे संकट समोर असतानाही काही लोक मात्र नदीच्या कडेला असणाऱ्या माड बागायतींमधून वाहून येणाऱ्या पुराच्या पाण्यात धोका पत्करून पुलावर उभे राहून नारळ पकडत असतात. हे वाहून येणारे नारळ पकडण्यासाठी आज देखील दांडेली आरोस बाजार पुलावर गर्दी झाली होती.

सावंतवाडीहून गोव्याकडे जाणारे अनेक लोक न्हावेली आररोस बाजार मार्गे जाणारा हा रस्ता सोयीस्कर व शॉर्टकट असल्यामुळे याच रस्त्यावरून जात असतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावर येत असलेले पाणी आणि वर्दळ लक्षात घेता या फुलाची उंची वाढविण्यासाठी विचार करणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 5 =