*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ऋतू विरहाचा..*
ऋतू विरहाचा फार कटू हो डोळे रडून लाल
पाऊस बरसतो नयनातून मग ओले वाहती गाल..
विरहार्त मनी साद सख्याची दूर दूर ती जाते
दु:ख ओसांडून वाहते आर्त असे ते नाते..
विरह असो तो प्राणप्रियाचा वा असो आईचा
अंगाखांद्यावर खेळवित असणाऱ्या दाईचा
बहिणीचा तो असो भावाचा वा,अथवा बापाचा
विरहाचे दिन फार कठीण हो भास होई शापाचा..
घरातील तो असेल रावा कि असो विरह मोत्याचा
जीवच लागत नाही घरात हो उद्रेक होई कोपाचा
मित्र मैत्रिणी असती जीवलग नाते असे ते हळवे
वाटा होती जेव्हा वेगळ्या मनातून ते जळवे..-
ऋतू विरहाचा फार भयंकर जाता जातच नाही
काय करावे कुठे ते जावे मुळीच उमजत नाही
घुसमट होते घालमेलही क्षण एक असे वर्षाचा
कातरवेळ तर फार भयंकर त्यात ऋतू विरहाचा..
विरह प्रियेचा जीवघेणा तो जाळून मनाला जातो
आयुष्याची मजाच जाते माणूस हतबल होतो
दोन जीवांचे नाते नाजुक मने गुंतली असती
प्रेमच जाते ओसांडून हो भावुक असती नाती…
प्रेम अशी ती गोष्ट एक हो ओलांडून सीमा जाते
प्रेमा इतके श्रेष्ठ जगी हो नाहीच कोणते नाते..
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
