You are currently viewing गुरू पौर्णिमा..

गुरू पौर्णिमा..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री उज्वला सहस्त्रबुद्धे लिखित श्री गुरु पौर्णिमा निमित्त लेख*

 

*गुरू पौर्णिमा..*

 

गुरूपौर्णिमा! गुरूविण नाही दुजा आधार! सतत मनात येतं की आजवर आपण या श्रद्धेवर जगत आलो आणि प्रत्येक प्रसंगात गुरूंनी आपल्याला तारून नेले.रामाचा अंश असणारे आपले गुरू गोंदवलेकर महाराज सतत आपल्या पाठीशी आहेत ही भावनाच माझ्या कडून प्रत्यक्ष काम करून घेत असते!

गुरूंवरील लेख,काव्य वाचन, मनन करता करता मनात सद्गुरू चिंतन होत होते. जन्म देणारी आई ही आपली पहिली गुरू!जसजसे मोठे होत जातो तसे हे गुरूपद आई वडील, नातेवाईक, शिक्षक, समाज यामध्ये वाढत जाते! प्रत्येकाकडून आपण काहीतरी शिकत असतो.

निसर्ग हाही आपला गुरू आहे, पुस्तके आपली गुरू आहेत,

या जाणिवा मोठं होत जाताना वाढू लागतात. सर्वसाक्षी परमेश्र्वर हा निसर्गात दिसू लागतो. हळूहळू आध्यात्मिक गुरूची गरज मनाला जाणवू लागते. असंच काहीसं माझ्या बाबतीत घडलं असं मला वाटतं!

माझ्या आजोळ घरी सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पादुका गेली १०० वर्षांहून अधिक वर्षे आहेत. स्वाभाविकपणे तिथे गुरूपौर्णिमा उत्सव दरवर्षी होतो.

आणि जेव्हा जमेल तेव्हा मी तिथे महाराजांच्या उत्सवासाठी जाते. ज्या काळात महाराज होते त्या काळात गरिबी, दुष्काळ, रोगराई या सारख्या संकटांचा फेरा सतत असे. लोकांमध्ये अज्ञानही खूप होते. सामान्य लोकांना संकटात आधार मिळत नसे. अशावेळी गोंदवलेकर महाराजांनी तिथे अन्नदान चालू केले. आणि लोकांत श्रध्दा निर्माण करून मन:शांती देण्याचा प्रयत्न केला.

ते स्वत: घोड्यावरून परिसरात फिरत आणि दीनदुबळ्या, गरीब लोकांना मदत करीत असत. गोंदवल्याला गाईंचे पालनही होत असे. ज्या गाईंना कसायाकडे नेले जात असे किंवा जी गुरे म्हातारी झाल्याने त्यांची. देखभाल होत नसे अशा गाई गुरांना आणून त्यांचे पालन करत असत.अजूनही गोंदवल्याला गाईंचा खूप मोठा गोठा आहे.

महाराजांनी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा त्रयोदशाक्षरी मंत्र भक्तांना दिला आणि अन्नदानाचे महत्त्व पटवून दिले.

अलिकडच्या काळात काही लोक महाराज, गुरू यावर विश्र्वास ठेवत नाहीत आणि ही सर्व भोंदुगिरी आहे असे समजतात. कारण अशी वाईट प्रवृत्तीची लोकंही समाजात आहेत. प्रत्येक क्षेत्रात ज्याप्रमाणे चांगल्या बरोबर वाईटही असते.

त्याप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्रातही भोंदू, लबाड लोक आहेत. त्यामुळे माणसाला विश्र्वास कशावर ठेवावा कळत नाही! आणि हे गुरूपूजन वगैरे अंधश्रध्दा आहे अशी मते ऐकायला मिळतात.

पण सगळे असेच आहे असे नाही. ‘भाव तेथे देव’ या उक्तीप्रमाणे आपली श्रध्दा असेल त्याप्रमाणे फळ मिळते. आताच्या जगात गुरू ओळखणे कठीण आहे. पण पूर्वी होऊन गेलेल्या सत्पुरुषांनी सांगितलेल्या मार्गावर जर आपण चाललो आणि कर्तव्यनिष्ठ जीवन व्यतीत केले तर ते गुरू पूजनच आहे!अशी माझी श्रध्दा आहे. त्याप्रमाणे संकट प्रसंगी तारक मंत्र असणार्या ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या मंत्रावर विश्वास ठेऊन गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने माझे आयुष्य अतिशय आनंदात, समाधानात जात आहे!

‘श्रीराम जयराम जय जय राम!’

 

उज्वला सहस्रबुद्धे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × three =