दोडामार्गच्या वीज समस्यांवर महावितरणची विशेष बैठक; २५ मागण्यांवर सविस्तर चर्चा
वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, जंगलातील विद्युतवाहिन्या, रिक्त पदे, ट्रान्सफॉर्मर व स्मार्ट मीटरच्या तक्रारी; अनेक मागण्यांवर सकारात्मक निर्णय
दोडामार्ग
तालुक्यातील वाढत्या वीज समस्यांबाबत अखेर पंचायत समिती सभागृहात महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, जंगलातून गेलेल्या विद्युतवाहिन्या, रिक्त पदे, कमी क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर, स्मार्ट मीटरबाबतच्या तक्रारी, जीर्ण वीज खांब तसेच उपअभियंत्याचे रिक्त पद अशा तब्बल २५ विविध मागण्या यावेळी महावितरणसमोर मांडण्यात आल्या. अनेक गंभीर विषयांवर सखोल चर्चा होऊन काही मागण्या तातडीने मान्य करण्यात आल्याने तालुकावासीयांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दोडामार्ग पंचायत समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस महावितरणचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधी, सरपंच, ग्रामस्थ आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील विविध भागांतील वीज समस्यांचा आढावा घेत अधिकाऱ्यांसमोर ठोस मांडणी केली. विशेषतः दुर्गम भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींवर लक्ष वेधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
या बैठकीस पंचायत समितीच्या सभापती पार्वती गवस, उपसभापती गणेशप्रसाद गवस, जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस व साक्षी तळवडेकर, पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर, दोडामार्ग नगरपंचायतीचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, राजेंद्र निंबाळकर, भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी, विविध गावांचे सरपंच तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
