You are currently viewing सर्व यंत्रणांचे आपत्ती व्यवस्थापन नियोजन चांगले

सर्व यंत्रणांचे आपत्ती व्यवस्थापन नियोजन चांगले

जीवित हानी होणार नाही ही आपली जबाबदारी – पालक सचिव वल्सा नायर-सिंह

जिल्ह्यासाठी 9 सॅटेलाईट फोन

सिंधुदुर्गनगरी 

जिल्ह्यात सद्या पडणाऱ्या पावसामुळे कोणतीही आपत्ती होणार नाही याबाबत सर्व यंत्रणांनी चांगले नियोजन केले आहे. शिवाय योग्य समन्वयही आहे. कोणत्याही आपत्तीमुळे जीवित हानी होणार नाही ही आपली जबाबदारी असून त्याची काटेकोरपणे दक्षता घ्याल, अशी अपेक्षा जिल्ह्याच्या पालक सचिव वल्सा नायर-सिंह यांनी व्यक्त केली.

            जिल्ह्यात सद्या पावसाचा रेड अलर्ट असल्याच्या पार्श्वभूमीवर पालक सचिव श्रीमती नायर-सिंह यांनी आज सर्व विभागांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, महावितरणचे अधिक्षक अभियंता विनोद पाटील, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, वंदना खरमाळे, प्रशांत पानवेकर आदी उपस्थित होते. तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

            जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सुरुवातीला पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि संगणकीय सादरीकरण करत सविस्तर माहिती दिली. यात प्रामुख्याने दाखल एनडीआरएफची टीम गेल्या 10 वर्षात जिल्ह्यात पडलेले सरासरी पर्जन्यमान, मुख्य धोके, पूर्वतयारी, वीज अटकाव यंत्रणा, शोध व बचाव साहित्य, साधन सामग्रीची व्यवस्था, नियंत्रण कक्ष, बोट प्रशिक्षण, होमगार्ड प्रशिक्षण, दरड साक्षरता कार्यक्रम, सद्यस्थिती यांचा समावेश होता. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भडकवाड यांनीही  जून, जुलै महिन्यातील पर्जन्य, सद्यस्थितीतील पावसामुळे झालेले नुकसान आणि पूर्वतयारी व नियोजन याची माहिती दिली.

            पालक सचिव श्रीमती नायर-सिंह म्हणाल्या, दरड प्रवण भागात विशेषतः खबरदारी घ्या. साधन सामग्री, त्यांची सुस्थिती, त्यांना लागणारे इंधन याची चोख व्यवस्था करा. वेळोवेळी त्याची तपासणी हवी. तुमच्या सर्व यंत्रणांची चांगली तयारी आहे. दूरदृष्य प्रणालीच्या द्वारे या पूर्वी झालेल्या बैठकांमधूनही तुमच्या सर्व यंत्रणांचे नियोजन आणि समन्वय चांगले असल्याचे दिसून आले आहे. सद्यस्थितीत नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या. सामाजिक संस्थांची यादी संपर्कासाठी तयार ठेवा. तुमच्या तयारीसाठी मी अभिनंदन आणि शुभेच्छा देते.

जिल्ह्यासाठी 9 सॅटेलाईट फोन

            जिल्ह्याचा सविस्तर आढावा देताना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, जिल्हा नियोजनमधून नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्ह्यासाठी यावर्षी बीएसएनएलकडून 9 सॅटेलाईट फोनची खरेदी केली आहे. लवकरच हे उपलब्ध होतील. बैठक संपत येत असतानाच हे 9 सॅटेलाईट फोन आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी दिली. यावर पालक सचिव श्रीमती वल्सा नायर-सिंह म्हणाल्या, यासाठी मनापासून अभिनंदन करते. या सॅटेलाईट फोनचा उपयोग आपत्तीमध्ये खूप चांगला होतो. गडचिरोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी असताना याचा मी अनुभव घेतला आहे.

            शेवटी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती सामंत यांनी आभार प्रदर्शन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × one =