पावसात बाजारपेठेतील रस्त्यांवर पाणी साचल्याने नगरसेवक देव्या सुर्याजी आक्रमक; तात्काळ कार्यवाहीची मागणी
सावंतवाडी :
पावसाच्या हलक्या सरीनंतरही शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवर पावसाचे पाणी तुंबत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या भागातील गटारांची कामे नव्याने व प्राधान्याने करावीत, अशी मागणी वारंवार करूनही संबंधित कामांना मंजुरी देण्यात आलेली नाही. परिणामी संचयनी आरपीडी रोड परिसर, कंटक पाणंद, साई मंदिर, पंचम देवस्थान तसेच चंदू भुवन परिसरातील मुख्य रहदारीच्या ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचत आहे.
याबाबत नगरपरिषदेच्या प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी केला आहे. मुख्याधिकारी यांना फोन केल्यास ते बैठकीचे कारण देतात, तर पाठविलेले संदेशदेखील पाहिले जात नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
श्री. सुर्याजी म्हणाले, नगरपरिषदेच्या पहिल्याच स्थायी समिती सभेत त्यांनी गटारांचा प्रश्न उपस्थित केला होता. मुख्य बाजारपेठेतील गटारांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे हलक्या पावसातही रस्त्यांवर पाणी साचत आहे. बाजारपेठ परिसर असल्याने शालेय विद्यार्थी, महिला व नागरिकांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. तसेच वाहनांच्या ये-जा मुळे चिखलयुक्त पाणी नागरिकांच्या अंगावर उडत असून मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
संचयनी आरपीडी रोड, कंटक पाणंद, साई मंदिर, पंचम देवस्थान आणि चंदू भुवन परिसरात हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन किमान तात्पुरती उपाययोजना करावी, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा येत्या दोन दिवसांत यावर कोणतीही कार्यवाही न झाल्यास रस्त्यावरील हाच चिखल मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात नेऊन ओतण्यात येईल, असा इशारा नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी दिला आहे.
