You are currently viewing ११ वर्षांनंतर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची आमसभा

११ वर्षांनंतर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची आमसभा

६ ऑगस्टला रंगणार विकासावर चर्चा

सावंतवाडी :

तब्बल ११ वर्षांनंतर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील मतदारसंघाची आमसभा होणार असून, येत्या ६ ऑगस्ट रोजी सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. या आमसभेत आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, वीज तसेच मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा घेत त्यावर चर्चा होणार आहे.

गेल्या ११ वर्षांत आमसभा न झाल्याने मतदारसंघातील अनेक प्रश्न प्रलंबित राहिल्याचा मुद्दा यापूर्वी उपस्थित करण्यात आला होता. सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांनी याबाबत आमसभा घेण्याची मागणी केली होती. त्यावर आमदार दीपक केसरकर यांनी आमसभा घेऊन सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील, असे आश्वासन दिले होते.

दरम्यान, बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही आमसभा विशेष महत्त्वाची ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, त्यानंतर ठाकरे शिवसेना आणि आता शिवसेना पक्षातील प्रवासानंतर आमदार केसरकर सध्या महायुतीत असल्याने यावेळी त्यांच्यासमोर पूर्वीसारखा तीव्र विरोधक राहण्याची शक्यता कमी असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

पूर्वी राणे समर्थकांकडून त्यांना मोठा विरोध होत असला, तरी सध्या बहुतांश प्रमुख राजकीय नेते महायुतीत असल्याने काँग्रेस, ठाकरे शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून कोणते मुद्दे उपस्थित केले जातात आणि ६ ऑगस्टच्या आमसभेत नेमकी कोणती भूमिका मांडली जाते, याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा