You are currently viewing कोकणातील शेतकरी, मच्छीमारांच्या वेदनांशी एकरूप; मंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय
Oplus_16908288

कोकणातील शेतकरी, मच्छीमारांच्या वेदनांशी एकरूप; मंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

‘जनतेच्या दुःखात सहभागी होणे हीच सर्वात मोठी भेट’; वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे आवाहन

सिंधुदुर्ग :

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान, लांबलेल्या पावसाळ्यामुळे मच्छीमार बांधवांची झालेली आर्थिक परवड तसेच राज्यातील अनेक भागांतील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी यंदा २३ जून रोजी होणारा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील शेतकरी, मच्छीमार आणि सर्वसामान्य नागरिक विविध संकटांचा सामना करत असताना उत्सव साजरा करण्यापेक्षा त्यांच्या वेदनांशी एकरूप होणे अधिक महत्त्वाचे असल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. समाजातील दुःख आणि अडचणींकडे संवेदनशीलतेने पाहणे हीच लोकप्रतिनिधीची खरी जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यासंदर्भात त्यांनी आपल्या सर्व हितचिंतक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांना वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेटीसाठी येऊ नये, असे आवाहन केले आहे. त्याऐवजी आपल्या परिसरात समाजोपयोगी उपक्रम राबवून गरजूंना मदतीचा हात द्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.

विशेषतः गो-सेवा आणि गौसंवर्धन, गोशाळांना मदत, जनावरांच्या संगोपनासाठी योगदान, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता मोहिमा, रक्तदान शिबिरे तसेच गरीब, गरजू आणि वंचित घटकांच्या मदतीसाठी विविध उपक्रम राबविण्यावर त्यांनी भर दिला आहे. समाजहिताचे कार्य हेच वाढदिवस साजरा करण्याचे खरे स्वरूप असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“कोकणातील बागायतदारांचे नुकसान, मच्छीमार बांधवांची परवड आणि राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता वैयक्तिक आनंदोत्सवाला फाटा देणे आवश्यक आहे. जनतेच्या दुःखात सहभागी होणे आणि सेवाभावातून समाजकार्यात योगदान देणे हीच माझ्यासाठी सर्वात मोठी वाढदिवसाची भेट असेल,” असे नितेश राणे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

राज्यातील कठीण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्याची चळवळ उभी राहण्यास या आवाहनामुळे चालना मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. “तुमचा सेवाभाव हीच माझ्यासाठी लाखमोलाची सदिच्छा असेल,” असे सांगत नितेश राणे यांनी सर्वांना समाजकार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा