You are currently viewing सिंधुदुर्गनगरीत ‘अस्सल गावठी आठवडा बाजार’ सुरू; शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ, ग्राहकांना ताजा शेतमाल

सिंधुदुर्गनगरीत ‘अस्सल गावठी आठवडा बाजार’ सुरू; शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ, ग्राहकांना ताजा शेतमाल

९ मे रोजी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते उद्घाटन; दर शनिवारी बसस्थानकाजवळ सकाळी ७.३० ते १२ पर्यंत बाजार भरणार

सिंधुदुर्गनगरी :

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी तसेच ग्राहकांना ताजा आणि सेंद्रीय शेतमाल उपलब्ध व्हावा या उद्देशाने सिंधुदुर्गनगरी येथे ‘अस्सल गावठी आठवडा बाजार’ सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे शेतकरी आणि ग्राहक यांच्यात थेट संपर्क प्रस्थापित होऊन दोघांनाही लाभ होणार आहे.

शनिवार, दिनांक ९ मे रोजी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते या बाजाराचे उद्घाटन होणार आहे. सिंधुदुर्गनगरी बसस्थानकाच्या बाजूला हा आठवडा बाजार भरविण्यात येणार असून पंचक्रोशीतील नागरिकांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.

या बाजारामध्ये स्थानिक सेंद्रीय शेतीमाल, ताज्या भाज्या, विविध फळे तसेच गावठी कडधान्ये उपलब्ध होणार आहेत. ‘थेट शेतकरी ते ग्राहक’ या संकल्पनेवर आधारित हा बाजार असल्यामुळे ग्राहकांना ताज्या आणि दर्जेदार मालाची हमी मिळणार आहे, तर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळण्यास मदत होणार आहे.

दर शनिवारी सकाळी ७.३० ते दुपारी १२ या वेळेत हा गावठी आठवडा बाजार भरविण्यात येणार आहे. पहिल्या बाजाराच्या उद्घाटनप्रसंगी सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण सदस्य तथा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जि.प. उपाध्यक्ष दादा साईल, प्राधिकरण सदस्य छोटू पारकर, भाजपा ओरोस मंडळ अध्यक्ष भाई सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या उपक्रमामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला उत्पादित माल विक्रीसाठी आणावा आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खरेदी करून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा