You are currently viewing १० वी व १२ वी पुरवणी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त अभियान’;

१० वी व १२ वी पुरवणी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त अभियान’;

१० वी व १२ वी पुरवणी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त अभियान’;

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे (कोकण विभागीय मंडळ) मार्फत दिनांक १६ जून पासून इयत्ता १० वी आणि १२ वीची पुरवणी परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षा जिल्ह्यात अत्यंत पारदर्शक, शांततेत आणि तणावमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकार रोखण्यासाठी आज जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

इयत्ता १२ वीची पुरवणी परीक्षा दिनांक १६ जून ते ०८ जुलै २०२६ या काळात आणि इयत्ता १० वीची पुरवणी परीक्षा दिनांक १६ ते ३० जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या पुरवणी परीक्षांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. इयत्ता १२ वी करिता श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी व एस. एम. हायस्कूल व ज्यु. कॉलेज, कणकवली परीक्षा केंद्र नियोजित आहेत. तसेच इयत्ता १० वी करिता कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी व एस.एम. हायस्कूल व ज्यु. कॉलेज, कणकवली परीक्षा केंद्र नियोजित आहेत.

या कालावधीत परीक्षा केंद्रांच्या परिसरात होणारे गैरप्रकार आणि अनुचित प्रकार रोखण्यासाठी सर्व परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ (प्रतिबंधात्मक आदेश) नुसार आदेश लागू करण्यात आले आहेत. सदर आदेशानुसार परीक्षा केंद्रांच्या ५०० मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर्स, एसटीडी बूथ आणि फॅक्स मशीन्स परीक्षा कालावधीत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील पुनर्गठित दक्षता समितीमधील वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस प्रशासनाचे प्रतिनिधी मार्फत जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देऊन तपासणी केली जाईल. परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांना कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी पत्रकार अथवा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना परीक्षा केंद्राच्या आत प्रवेश दिला जाणार नाही. सदर परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आणि अनुचित प्रकार रोखण्यासाठी सर्व परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ (प्रतिबंधात्मक आदेश) नुसार कडक कारवाई केली जाईल, असे निर्देश देण्यात आले.

परीक्षा काळात वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरणच्या प्रमुखांना आणि विद्यार्थ्यांच्या केंद्रापर्यंतच्या वाहतुकीसाठी एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक यांना विद्यार्थ्यांच्या सोईच्या दृष्टिने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सर्व परीक्षा केंद्रांवर केंद्रसंचालकांची नियुक्ती करण्यात आली असून प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही दडपणाशिवाय आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा