You are currently viewing माझे गांव कापडणे…

माझे गांव कापडणे…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*माझे गांव कापडणे..*

 

मंडळी नमस्कार,
यात्रेवरून आठवले, मी तुम्हाला पाळण्या
विषयी बोलले ना? तर तो होता नथा वडारचा.
गांव त्याला नथ्थू वड्डर म्हणत असे. ही मंडळी
दक्षिणेतली असावी असे त्यांच्या भाषेवरून व वेषा वरून वाटते.एस टी स्टॅंड जवळ नदीच्या त्याच कडेला त्यांचे झोपडे होते. हा नथू बहुधा
दरोडेखोर होता. गावात त्याने कधी दरोडा घालणे शक्यच नव्हते कारण पूर्ण गावावर
वडिलांचा वचक व दरारा होता.माझ्या वडिलांना भीती नावाचा शब्दच माहित नव्हता.

मी खूप लहान होते. प्रचंड घाबरायचे मी, इतकी की त्या वडारांच्या झोपड्यांकडेही
पहात नसे. गावात ही, मंडळी काठीला दोराचा
फास लावून डुकरं पकडत असत.४/६ माणसांची टोळी फास घेऊन दिसली की डुकरांची प्रचंड पळापळ होत असे. डुकरांच्या
मागे हे वडार व त्यांच्या मागे मुलांची झुंड..
गावात हाऽऽऽऽऽ धुमाकूळ चालत असे. शेवटी
१/२ डुकरं त्यांच्या हाती लागली की त्याच्या
मुसक्या व पाय बांधून खांद्यावर टाकून ते नदीकाठी आपल्या झोपडी जवळ घेऊन जात
व अंगणात जाळावर उलटा टांगून त्याला भाजत असत. दर ८/१५ दिवसांनी त्यांची गावात ही पळापळ चाले व लोकांना फुकटचा
तमाशा बघायला मिळे.आम्हीही लांबून त्यांची
पळापळ बघत असू.

हे लोक रामाचे भक्त असावेत असे वाटते.कारण वडार बायकांनी सीतेला देवी मानून त्यांनी चोळीचा त्याग केला होता असे नथ्थू वडाराची बायको आईला सांगतांना मी ऐकल्याचे आठवते.हो,राम सोनेरी हरणामागे धावतांना दूर गेला नि सीतेचे अपहरण झाले.चोळीमुळे रामायण घडले असे त्यांना वाटत होते.अंगभर पदर घेऊन त्या वावरत असत.

आता तुम्ही म्हणाल, आईला कशा भेटल्या त्या? सणासुदीला आपल्याकडे गोरगरिबांनी
सण मागायची पद्धत आहे. नथू वडारची बायको सणाला भारी भारी सुंदर साड्या व भरपूर अंगभर सोन्याचे दागिने घालून डोक्यावर
पाटी घेऊन सण मागायला येत असे.बहुतेक डाक्यातले ते दागिने असावेत. काळी सावळी
बारीकशी उंच अशी ती नटून थटून आली की छान दिसे.विष्णुभाऊंची बायको म्हणून आईला सारेच ओळखत. ती पण आली की दारात बसून आईशी ऐसपैस गप्पा मारत असे व स्वत:ची सुखदु:खे सांगत असे.स्वभावाने छानच होती ती! नवरा दरोडेखोर होता यात तिचा काय दोष होता?आणि त्याने तिला
सुखात ठेवले होते.

आता लिहितांना मी विचार करते आहे की, बघा, एवढ्या मोठ्या माणसाची बायको माझी
आई, वडाराच्या बायकोची सुखदु:खे ऐकून घेत
होती, किती सौहार्द होते बघा वागण्यात! मी
आजूबाजूलाच असे पण लांबून बघत असे.मला पण ती वडारीण सुंदर वाटायची, छान छान पिवळेधम्मक दागिने घातलेली, नाकात चमकी असलेली, आईला ती दागिने
दाखवायची नि खुश व्हायची! चेहरा आता ही आठवतो मला जसाचा तसा! खूप खुष असायची. माझी बहिण तिच्या फिरक्या घेत विचारायची की पोत किती तोळ्याची आहे? कारण आम्ही पण एवढे सोने कधी पाहिले नव्हते ना?

मग आई तिला
गप्पाटप्पा झाल्यावर सणाचे वाढून द्यायची.
नकळत आईच्या वर्तनातून दारात आलेल्या व्यक्तीशी कसे वागावे हा संस्कार माझ्या मनावर झाला. दिवाळीला अक्षय तृतियेला
कुंभारीण दारातच पणत्या सुगडे, घागर घेऊन यायची तेव्हाही कुंभारीण खुश असायची व तोंडभर हसायची. आईने धान्य पाटीत घातले की हसत हसत बाहेर पडायची!

अहो, सोनगिरचा कासार कासम भाई ही आमच्या ओट्यावर बसूनच समस्त महिला मंडळाला बांगड्या भरत
असे. हा कासम भाई मुसलमान असून बायका
बिनदिक्कत त्याच्याकडून बांगड्या भरून घेत.
तो आमच्या ओट्यावरच जेवत असे. आई त्याला काहीबाही जेवतांना द्यायची.तो धान्य घेऊन जायचा व ते विकायचा. पूर्वी बरेच व्यवहार असे धान्य देवघेव करून होत असत.
किती तरी वर्ष कासम भाईचा क्रम चुकला नाही. मला बांगड्या भरल्या की माझ्याकडून
लगेच त्या फुटायच्या मग आई पासून हात लपवणे मुष्किल होऊन आई रागावण्याची भीती वाटायची.

असे एकूणच तेव्हा
समाजात सौहार्द होते. जे मिळेल त्यात लोक खुश असायचे.दारात रोज एक गोसावी
जातीचा इसम सकाळी सकाळी “बेल”द्यायला
यायचा. मी बेल घेतला की त्याच भांड्यात दारातच बाजरीचं पोतं भिंतीला टेकून उभे असे
त्यातले दोन पसा दाणे टाकून परत त्याला देत
असे.रात्री आम्ही जेवायला बसत असू त्या सुमारास बलुतेदाराची” भाकर वाढ वं माय “ अशी आरोळी येताच मी जेवण तसेच सोडून टोपलीतील अर्धी भाकरी त्याच्या पाटीत टाकत असे.तत्पूर्वी त्याने हातात रॅाकेलचा पिंट
घेऊन अंगणातल्या खुंटावरचा खुटकंदिल लावलेला असे.गांवभर असे खुटकंदिल लावावे लागत कारण वीज नव्हती ना? सारी कामे कशी ठरल्याबरहुकूम चालत असत. कुणाची काही तक्रार नव्हती की भांडण नव्हते. माझ्या वडिलांच्या चावडीत आमच्या घरातच सारे
अठरापगड जातीचे लोक माझ्या वडिलांच्या
मांडीला मांडी लावून बसत असत.ग्रामपंचायतीची कामे ठरल्याबरहुकूम चालत असत. त्यातही कामचुकार होतेच, वडिल मग त्यांना बोलावणे पाठवून गटारी साफ करवून घेत असत.

या गटारींवरून आठवले, माझ्या वडिलांचा खाक्या काही वेगळाच होता.मनात आले की
करून मोकळे झाले, थांबणे माहितच नव्हते
त्यांना..

रोज लोकांची कामे व खादी भांडारची नोकरी, त्यामुळे रोज सकाळी जेवण झाले की चालले
धुळ्याला. आमची भात नदी तेव्हा दुथडी वहायची. एकदा तर आमचा आठवीचा इतिहासाचा तास बी एस पाटील सर घेत
असतांना वरच्या बाजुला पाऊस झाला असेल
तर कापडण्यात पाऊस नसतांनाही पुराची मोठ्ठी लाट फू फू करत नागिणी सारखी सुसाट
आलेली वरच्या मजल्यावरून आम्हाला दिसली, व आम्ही चकित झालो. जीप उनी जीप उनी म्हणत मुले बघतच राहिले.

मी अगदी लहान असतांना नदीला असाच पूर
आलेला होता नि नदीवर फरशी नव्हती. वडिल
धुळ्याहून कापडण्याला आले पण नदी फुफाट
होती. खूप लोक तिकडच्या काठावर उतार पडण्याची वाट पाहत थांबले होते, पण पाणी
कमी होईना. वडील पट्टीचे पोहणारे होते. त्यांनी सरळ नदीत उडी टाकली व पोहत नदी
पार करून पैलतीरावर आले. इकडे आई चिंतेतच होती वडिल का आले नाही म्हणून?
मी ही ते ऐकले होते, तेवढ्यात नखशिखांत
भिजलेले वडिल घरात आले. आईने आंघोळीला गरम पाणी दिले व वडिलांनी आंघोळ केली व जेवण ही केले.

अंथरूणावर पडताच मात्र डोक्यात विचारचक्र
सुरू झाले, नदीवर फरशी पूल झाला पाहिजे.
विचार आला नि दुसऱ्याच दिवशी संध्याकाळ
पर्यंत नदी काठावर सिमेंटच्या गोण्या वाळू
फरशा धडाधड बैलगाड्या रिकाम्या होऊ लागल्या…!

बरंय् मंडळी.. भेटूच पुढच्या रविवारी..
जयहिंद जय महाराष्ट्र..

आपलीच,
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा