वनविभागासमोरील रस्त्यावर पाणी साचल्याने अपघातांची मालिका
पालकमंत्री नितेश राणेंची तातडीची दखल; चार दिवसांत काम पूर्ण करण्याचे मुख्याधिकाऱ्यांना आदेश
सावंतवाडी
अधिकारी आणि ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे सावंतवाडी येथील वनविभागासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने आज सकाळपासून अपघातांची मालिका सुरू झाली. पाणी साचल्यामुळे रस्त्यालगतच्या उघड्या गटारांचा अंदाज न आल्याने अनेक पादचारी गटारात कोसळले, तर दुचाकी आणि चारचाकी वाहने अडकून पडल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
वनविभागासमोरील परिसरात सध्या मोरीचे काम सुरू आहे. मात्र, निवडणूक आचारसंहितेमुळे वर्क ऑर्डर मिळण्यास उशीर झाल्याचा दावा नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आला होता. प्रशासकीय दिरंगाईमुळे काम रखडल्याने त्याचा फटका थेट नागरिकांना बसला. पावसाच्या पाण्यामुळे संपूर्ण परिसराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. उघड्या गटारांमुळे आज सकाळपासून अनेक लहान-मोठे अपघात घडले. तसेच एक चारचाकी वाहन गटारात अडकल्याने मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
या प्रकाराची माहिती मिळताच पालकमंत्री यांनी सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. अधिकारी आणि ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची नाराजी व्यक्त करत, कोणत्याही परिस्थितीत पुढील चार दिवसांत काम पूर्ण करून रस्ता पूर्ववत करण्याचे कडक निर्देश त्यांनी दिले.
पालकमंत्र्यांनी स्वतः या समस्येची गंभीर दखल घेत प्रशासनाला तंबी दिल्याने रखडलेले काम आता वेगाने पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या तातडीच्या हस्तक्षेपाबद्दल स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
