You are currently viewing कोणीच कोणाकडे न पाही..!

कोणीच कोणाकडे न पाही..!

*कोणीच कोणाकडे न पाही..!*

*चिंतन की …..?*
*अबोल छायाचित्रात बोलक्या प्रतिक्रिया..*

महायुतीच्या धर्मातून एकत्र आलेले नाम.केसरकर, मा.खासदार निलेश राणे व मा.आमदार राजन तेली हे मा.नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयात एकत्र बसलेले छायाचित्रात दिसत असले तरी कोणीही कोणाकडे पाहत नसून प्रत्येकाचे चेहरे काहीसे वेगळेच बोलताहेत असे प्रदर्शित होत आहे. कधी एकमेकांशी टोकाचा संघर्ष करणारे, अगदी खालच्या पातळीवर येऊन एकमेकांवर चिखलफेक करणारे, कधी केसरकरांना पाडण्यासाठी नवनवे डावपेच आखणारे, काहीच दिवसात पुन्हा विधानसभेत एकमेकांच्या विरोधात सुद्धा उभे राहण्याची दाट शक्यता असणारे संजू परब यांच्या कार्यालयात चार दिवसांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीची चिंता की चिंतन करत बसलेले आहेत..? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

लोकसभा निवडणूक अगदी चार दिवसांवर आली आहे परंतु जनतेच्या दरबारात “हम सब एक है..!” असे दर्शविणारे खरोखर एकत्र आलेत का..? जिल्हा विकासाच्या वल्गना आपण प्रत्येकाकडून ऐकत असतो परंतु राजकीय धुरंधरांमध्ये एकी नसेल तर विकास हा काल्पनिक, घोषणांमध्येच सिमित राहतो त्याला मूर्त स्वरूप येत नाही. नाम.केसरकर आणि मा.आमदार राजन तेली गेले एक दशक एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. पक्षाच्या निर्णयाच्या विरोधात जात तेलींनी केसरकरांना चितपत देण्याचा प्रयत्न दोन विधानसभा निवडणुकांमध्ये केलेला आहे. आजही येत्या विधानसभा निवडणुकीत ते दीपक केसरकर यांचे प्रतिस्पर्धी असतील ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि केवळ त्यासाठीच त्यांनी सावंतवाडीत स्वतःचे निवासस्थान उभे करून कणकवलीकर हे बिरूद पुसून सावंतवाडीकर असा शिक्का मारून घेण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित अशाच कुरघोडींमुळे नाम.नारायण राणेंसाठी एकत्र आलेले प्रतिस्पर्धी एकमेकांकडे पाहणे टाळतात की काय..? असा प्रश्न साहजिकच उपस्थित होत आहे.. आणि हे होणारच..!
सत्तेसाठी म्हणा किंवा “अब की बार चारसौ पार” या मोदींच्या घोषणेसाठी…विविध पक्ष, नेते एकत्र आले तरी विचार आणि मने जुळतील का..?

प्रतिक्रिया व्यक्त करा