You are currently viewing मुख्यमंत्र्यांसोबत वैर नाही; पण चीपीच श्रेय आमचंच…

मुख्यमंत्र्यांसोबत वैर नाही; पण चीपीच श्रेय आमचंच…

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे

मुंबई:

चिपी विमानतळाचं सर्व श्रेय आमचंच आहे. शिवसेनेचा त्याच्याशी काही संबंध नाही, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आमचं काही वैर नाही. त्यांनी पाहुण्यांसारखं यावं.

हवं तर म्हावऱ्याचा पाहुणाचारही करू. जाताना मात्र जिल्ह्याला काही तरी देऊन जावं, असं केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सांगितलं. सिंधुदुर्गात उद्या चिपी विमानतळाचं लोकार्पण होणार आहे. त्यापूर्वीच राणेंनी चिपीचं श्रेय आपलं असल्याचं सांगून शिवसेनेत खळबळ उडवून दिली आहे.

नारायण राणे यांनी भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सिंधुदुर्गसाठी आपण काय काय केलं याची जंत्रीच सादर केली. तसेच चिपी विमानतळासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा आढावाही घेतला. चिपी विमानतळाचे सर्व श्रेय भाजप आणि आमचं आहे. त्यात कुणाचंही श्रेय नाही. पाहुणे म्हणून आम्ही बोलावलंय पाहुणे म्हणून या. पदाप्रमाणे काही तरी द्या आणि जा. नाही तर पूर्वी मोठमोठी माणसं कार्यक्रमाला यायची, एक मंत्री आला की मोठमोठे रस्ते व्हायचे. आता एकदोन तीन रस्त्यांचे पैसे तरी द्या. विकासाच्या अनेक गोष्टी आहेत. त्याला पैसे द्या. वादळाच्यावेळी जाहीर केलेले पैसे द्या. पूरपरिस्थितीत जाहीर केलेले पैसे द्या, असं राणे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचं स्वागत करू

चिपी विमानतळाचं काम मीच केलं आहे. त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आम्ही केल्या आहेत. शिवसेनेचं काहीही श्रेय नाही. या कामाचं श्रेय माझं आणि भाजपचं आहे, असं सांगतानाच उद्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या कार्यक्रमातही आम्हीच हे काम आम्ही केल्याचं सांगणार आहोत. मुख्यमंत्र्यांसोबत आमचा वाद नाही. वैर नाही. त्यांनी यावं, त्यांचं स्वागत आहे. सिंधुदुर्गाच्या म्हावऱ्याचा पाहुणचार करू, पण जे मिरवतात त्यांनी मिरवू नये, असा टोला राणेंनी हाणला.

मी असतो चित्रं वेगळं असतं

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेलं नाही. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ही सरकारची संकुचित मनोवृत्ती आहे. हा सरकारी कार्यक्रम आहे. हा काही देसाईंच्या घरचा कार्यक्रम नाही. त्यांच्या मुलाचं लग्न नाही. देवेंद्र सहनशील नेते आहेत. मी त्यांच्या जागी असतो तर चित्रं वेगळं असतं, असं राणे म्हणाले. तसेच मी देवेंद्र फडणवीसांशी या विषयावर चर्चा केली. तेव्हा फडणवीसांनी जनतेच्या हिताचा कार्यक्रम आहे. आंदोलन निदर्शने करू नका, असं सांगितलं. मात्र त्यांना निमंत्रण न देणं, त्यांचं निमंत्रण पत्रिकेत नाव नसणं ही संकुचित मनोवृत्ती आहे, असंही ते म्हणाले.

मी त्यांच्यापेक्षा सीनियर

माणसाने संकुचित किती असावं बघा. चिपी विमानतळाची कार्यक्रम पत्रिका छापली आहे. त्यात माझं नाव बारीक अक्षरात छापलं आहे. त्यावर शाईही फाटली आहे. शिवाय माझं नावही तिसऱ्या क्रमांकावर टाकलं आहे. मी राजकारणात आणि प्रोटोकॉलमध्येही मी दोघांपेक्षा सीनियर आहे. पण ठिक आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांना पहिला मान दिला काही हरकत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री कोण आहे हे महत्त्वाचं नाही. माझं नाव बारीक का झालं हे माहीत नाही. ही एक वृत्ती आहे, असं राणे म्हणाले.

तेव्हा चिल्लर कुठे होते?

यावेळी त्यांनी सिंधुदुर्गाचा विकास आपणच केल्याचं सांगितलं. तसेच चिपी विमानतळाचं कामही आपणच मार्गी लावल्याचं त्यांनी सांगितलं. 1990 मध्ये पहिल्यांदा मी सिंधुदुर्गातून आमदार झालो. रस्ते नव्हते, डांबरीकरणाचा पत्ता नव्हता, शैक्षणिक सुविधा नव्हत्या. जिल्ह्यात भात सोडला तर दुसरं पिक नव्हतं. गरीबी होती. ऊदरनिर्वाहासाठी औद्योगिकीकरण नव्हतं. दरिद्री जिल्हा म्हणून संबोधलं जायचं. त्यावेळी जिल्ह्याच्या विकासासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. त्या जिल्ह्याचा विकास कसा करता येईल, त्यासाठी टाटा कंपनीकडे गेलो. टाटांनी काही महिन्यानंतर रिपोर्ट दिला. सिंधुदुर्गाच्या विकासाची ती ब्लू प्रिंटच होती. पर्यटनानेच हा जिल्हा विकसित होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं. ते समजल्यानंतर मी जिल्ह्याच्या पर्यटनासाठी प्रयत्न केले. आता जी चिल्लर फिरतेय ना बाजारात… जे म्हणतात ना आम्हीच केलं, आम्हीच केलं… तेव्हा हे कुठेच नव्हते, अशी टीका त्यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा