*केंद्रप्रमुख अनंत कदम यांना सेवानिवृत्त निमित्ताने शेर्ले केंद्राच्या वतीने सदिच्छा समारंभ*
शेर्ले
आयुष्यभर शिक्षणसेवेचा दीप अखंड तेवत ठेवत हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञान, संस्कार आणि प्रेरणेचा प्रकाश पेरणारे केंद्रप्रमुख अनंत कदम यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शेर्ले केंद्राच्या वतीने त्यांचा सहकुटुंब अत्यंत भावपूर्ण वातावरणात सत्कार करण्यात आला. अनेक वर्षे शिक्षक, विद्यार्थी आणि सहकाऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी झालेल्या या संवेदनशील व्यक्तिमत्त्वाला निरोप देताना उपस्थितांचे डोळे अक्षरशः पाणावले होते.
सभागृहात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि विरह या दोन्ही भावना स्पष्ट दिसत होत्या. “कदम सर” हे केवळ अधिकारी नव्हते, तर अनेक शिक्षकांसाठी आधारवड, मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान होते. त्यांच्या शांत, संयमी आणि प्रेमळ स्वभावामुळे त्यांनी प्रत्येकाच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.
आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी केवळ प्रशासन सांभाळले नाही, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. अनेक शाळांना दिशा देत, शिक्षकांना प्रोत्साहन देत आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत त्यांनी शिक्षण क्षेत्र समृद्ध केले. त्यामुळे त्यांचा निरोप हा एका पदाधिकाऱ्याचा शेवट नसून, एका प्रेरणादायी प्रवासाला दिलेली कृतज्ञ मानवंदना ठरली.
समारंभात अनंत कदम व त्यांच्या कुटुंबीयांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक शिक्षकांनी आपल्या मनोगतातून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. “कडक शिस्तीबरोबरच मायेचा हात देणारे अधिकारी आज दुर्मिळ आहेत,” असे सांगताना अनेकांचे कंठ दाटून आले.
यावेळी मुख्याध्यापक लक्ष्मीकांत कराड, नारायण नाईक, शिल्पा गोठोस्कर ,सेवानिवृत्त शिक्षक बाबाजी झेंडे, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख म. ल. देसाई, प्रमोद पावसकर, गौरवी पेडणेकर, संघटना प्रतिनिधी गोविंद शेर्लेकर, तुषार आरोसकर, राज्य आदर्श शिक्षक जे. डी. पाटील, रश्मी सावंत, स्वाती पाटील, नीता मेस्त्री यांच्यासह शेर्ले केंद्रातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना अनंत कदम यांनाही भावना अनावर झाल्या. “विद्यार्थ्यांचे निरागस प्रेम, सहकाऱ्यांचे सहकार्य आणि समाजाने दिलेला सन्मान हीच माझी खरी कमाई आहे,” असे म्हणताना त्यांचा आवाज भरून आला. त्यांच्या या शब्दांनी सभागृहातील वातावरण आणखी भावूक झाले.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शेर्ले केंद्रातील शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. प्रत्येकाने हा समारंभ आपल्या कुटुंबातील व्यक्तीचा सोहळा असल्याप्रमाणे मनापासून जबाबदारी सांभाळली. त्यामुळे हा निरोप समारंभ केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता, प्रेम, आदर, कृतज्ञता आणि जिव्हाळ्याच्या भावनांनी ओथंबलेला अविस्मरणीय क्षण ठरला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालक साक्षी कोलते तर आभार प्रिया सावंत यांनी मानले.
