You are currently viewing इतिहास संशोधन करतांना…

इतिहास संशोधन करतांना…

*के. रा. कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवलीचे प्रा प्रशांत शिरुडे लिखित अप्रतिम लेख*

 

*इतिहास संशोधन करतांना…*

 

प्रत्येक राष्ट्राला स्वतःचा एक इतिहास असतो. तो इतिहास नियमितपणे त्या राष्ट्राला प्रेरणा देत राहतो. त्या प्रेरणेमुळे ते राष्ट्र आत्मनिर्भर होते. आपला बराच मोठा इतिहास परकीयांनी लिहिला. तो म्हणावा तसा आपल्यासाठी प्रेरणादायी ठरला नाही. अनेक इतिहास संशोधक संशोधन करत असतात. आजही आपला खूप मोठा इतिहास व त्यातील अनेक संकल्पना संशोधकांच्या प्रतिक्षेत आहेत. एखाद्या घटकावर संशोधन करतांना आधी त्या घटकासंदर्भात किती आणि काय काम झाले हे समजून घेणे आवश्यक असते. एकदा का ते समजले तर त्या संदर्भात आपल्याला पुढे काय काम करायचे ते कळू शकते. अन्यथा आधी इतरांनी जे केले तेच आपण केले तर ते संशोधन नाही होत. त्याला मान्यता ही मिळत नाही. एखादी घटना जेव्हा आपण बघतो, ऐकतो किंवा वाचतो त्यावेळी आपल्या मनात त्या घटने संदर्भात जे चिकित्सात्मक भाव उत्पन्न होतात व त्यातून आपण जे निष्कर्ष काढतो त्यालाच साकल्याने संशोधन असे म्हणतात. इतकी संशोधन प्रक्रिया सोपी असते.

विज्ञान संशोधनात पुन्हा-पुन्हा प्रयोग करून त्यात आलेले निष्कर्ष पडताळून पाहता येतात. निष्कर्ष है सार्वत्रिक व सार्वकालिक असतात. उदाहरणार्थ न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला हा शोध लागण्यापूर्वीसुद्धा वस्तू वरून खाली पडत होती आणि हा शोध लागल्यानंतर सुद्धा वस्तू वरून खालीच पडते. पृथ्वीतलावर कुठेही यात स्थळ, काळ परत्वे बदल नाही होत. यालाच आपण संशोधनाची प्रायोगिक पद्धत किंवा प्रत्यक्ष निरीक्षण पद्धत म्हणतो. न्यूटनने या घटनेकडे ज्या चिकित्सक दृष्टीने बघितले आणि त्यावर मंथन करून जो सिद्धांत मांडला त्याला आपण गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत म्हणतो.

पण इतिहास संशोधनात असे करता येत नाही. कारण ऐतिहासिक घटना या पूर्वी घडून गेलेल्या असतात. आपल्याला संशोधन करायचे म्हणून त्या पुन्हा घडवून आणता येत नाहीत. उदाहरणार्थ १७६१ मध्ये झालेले पानिपतचे युद्ध, एखाद्या इतिहास संशोधकाला, संशोधन करायचे म्हणून ते युद्ध पुन्हा होऊ शकत नाही. त्यामुळे इतिहासाचे संशोधन करताना ज्या घटकासंदर्भात संशोधन करावयाचे आहे त्या संदर्भातील उपलब्ध असलेले दस्तऐवज, त्या कालखंडातील दगड किंवा धातूच्या आज उपलब्ध असलेल्या वस्तू, युद्धाच्या ठिकाणी असलेल्या खुणा, वापरलेली हत्यारे, पत्रव्यवहारासाठी वापरलेल्या कागदाचा कालखंड किंवा त्याच्या शाईचा कालखंड, भाषा, लेखन शैली, भाषा शैली, लिपी, अक्षरांचे वळण, अधिकार दर्शक मुद्रा, तत्कालीन सामाजिक स्थिती, राजकीय घडामोडी, भौगोलिक परिस्थिती, शेती, व्यापार, दळणवळणाची साधने, गुहाचित्रे, लोकगीते, आख्यायिका, पोवाडे, श्रुती, स्मृती, इतर संदर्भ साहित्य आदींचे चिकित्सापूर्वक निरीक्षण करावे लागते. इतिहास संशोधन करतांना जसजशी नवीन ऐतिहासिक माहिती, दस्तऐवज मिळत जातात तसतशा जुन्या संकल्पना बदलून नवीन संकल्पना प्रस्थापित होत जातात. म्हणजेच जसे पुरावे उपलब्ध होत जातात तसे इतिहास संशोधनात बदल होत जातात. वस्तुत: कोणतेही संशोधन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. फक्त त्यात जागा नसते ती दैवी कल्पनांना.

धन्यवाद.

लेखक.

प्रा. प्रशांत पुंडलिक शिरुडे

के. रा. कोतकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली जि. ठाणे

9967817876

prashantshirude1674@gmail.com

प्रतिक्रिया व्यक्त करा