You are currently viewing लाईटनिंगमुळे फोंडाघाटमधील ट्रान्सफॉर्मर जळाला; बाजारपेठेसह अनेक भाग अंधारात

लाईटनिंगमुळे फोंडाघाटमधील ट्रान्सफॉर्मर जळाला; बाजारपेठेसह अनेक भाग अंधारात

लाईटनिंगमुळे फोंडाघाटमधील ट्रान्सफॉर्मर जळाला; बाजारपेठेसह अनेक भाग अंधारात

मारुतीवाडी, बिजलीनगर, हवेलीनगरचा वीजपुरवठा खंडित; नवीन ट्रान्सफॉर्मर बसवेपर्यंत नागरिकांना प्रतीक्षा

फोंडाघाट :

शनिवारी सायंकाळी झालेल्या विजांच्या कडकडाटामुळे (लाईटनिंग) फोंडाघाट येथील तीन खांबांवरील मोठा ट्रान्सफॉर्मर जळाल्याने संपूर्ण फोंडाघाट बाजारपेठेसह मारुतीवाडी, बिजलीनगर आणि हवेलीनगर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर महावितरण (एमएसईबी) विभागाकडे तक्रार करण्यात आली. मात्र संबंधित उपअभियंता (सब इंजिनिअर) बाहेरगावी असल्याने दुरुस्तीच्या कामात विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संपूर्ण रात्र वीजपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे.

नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम रविवारी सकाळी हाती घेतले जाणार असून दुपारी सुमारे १२ वाजेपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे. तोपर्यंत नागरिकांना अंधारासह पाणीटंचाईच्या समस्येलाही सामोरे जावे लागणार आहे.

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे घरगुती कामकाज, व्यावसायिक व्यवहार तसेच पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. या गंभीर परिस्थितीकडे महावितरण प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे तसेच लोकप्रतिनिधींनीही हस्तक्षेप करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा