संत निरंकारी स्वयंसेवकांचा सिंधुदुर्गभर स्वच्छता अभियानात उत्स्फूर्त सहभाग
जिल्हा परिषद व जिल्हा पाणी-स्वच्छता मिशनच्या ‘श्रमदानातून परिसर स्वच्छता’ मोहिमेला शेकडो स्वयंसेवकांचे योगदान
वेंगुर्ले
संत निरंकारी मिशनच्या सामाजिक शाखा ‘संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन’च्या विद्यमाने झोन चिपळूण-४० अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो स्वयंसेवकांनी जिल्हा परिषद आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘श्रमदानातून परिसर स्वच्छता’ अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वच्छतेच्या जनजागृतीला हातभार लावला.
ग्रामीण भागातील स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि स्वच्छतेची लोकचळवळ निर्माण करण्याच्या उद्देशाने संपूर्ण जिल्ह्यात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. या उपक्रमात नागरिकांसह विविध सेवाभावी संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशननेही सक्रिय सहभाग घेतला.
जिल्ह्यातील १८ ग्रामीण व शहरी ठिकाणी राबविण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानात स्वयंसेवकांनी श्रमदान करत परिसर स्वच्छ केला. देवगड येथील उपजिल्हा रुग्णालय, मोंड व तिर्लोट प्राथमिक आरोग्य केंद्र, कणकवली उपजिल्हा रुग्णालय, फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्र, वारगाव जिल्हा परिषद शाळा, नांदगाव ग्रामपंचायत, आंदुर्ले व आकेरी येथील जिल्हा परिषद शाळा, तुळसुली तिठा, ओरोस फाटा, छत्रपती शिवाजी महाराज चौक (ओरोस), मालवण येथील चिवला बीच, तळवडे (मातोंड), पेंडूर-घोडेमुख ग्रामपंचायत, ओटवणे व इन्सुली प्राथमिक आरोग्य केंद्र, निरवडे ग्रामपंचायत तसेच दोडामार्ग तालुक्यातील उपस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
संत निरंकारी मिशन आध्यात्मिक जागृतीसोबतच मानवसेवेच्या विविध उपक्रमांद्वारे समाजकार्य करत आहे. ‘अमृत प्रोजेक्ट’ अंतर्गत जलस्रोत संवर्धन, ‘वननेस वन’ वृक्षारोपण मोहीम, तलासरी सिमेंट नाला बांध प्रकल्प, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिरे, महिला सशक्तीकरण आणि युवकांना सकारात्मक दिशा देणारे विविध उपक्रम मिशनमार्फत राबविले जात आहेत.
विशेष म्हणजे, संत निरंकारी मिशन २०१४ पासून संयुक्त राष्ट्रांच्या ‘युनायटेड नेशन्स एन्व्हायरनमेंट प्रोग्राम’च्या संकल्पनेनुसार ‘विश्व पर्यावरण दिन’ विविध उपक्रमांनी साजरा करत आहे. यंदाही संपूर्ण देशातील १८ पर्वतीय पर्यटनस्थळांवर पर्यावरण संवर्धन व स्वच्छतेचा संदेश देणारे विशेष अभियान राबविण्यात आले.
