You are currently viewing कणकवलीत अनधिकृत बॅनर-फ्लेक्सवर नगरपंचायतीचा दणका; परवानगी व QR कोड सक्तीचा

कणकवलीत अनधिकृत बॅनर-फ्लेक्सवर नगरपंचायतीचा दणका; परवानगी व QR कोड सक्तीचा

कणकवलीत अनधिकृत बॅनर-फ्लेक्सवर नगरपंचायतीचा दणका; परवानगी व QR कोड सक्तीचा

NOC शिवाय जाहिराती छापू नयेत; नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह गुन्हा दाखल करण्याचा इशारा

कणकवली :
कणकवली नगरपंचायत हद्दीत अनधिकृतपणे उभारण्यात येणारे जाहिरात फलक, बॅनर, फ्लेक्स आणि होर्डिंग्ज यांच्याविरोधात नगरपंचायतीने कठोर भूमिका घेतली असून, लवकरच विशेष कारवाई हाती घेण्यात येणार आहे. यासंदर्भात शहरातील प्रिंटिंग प्रेस चालक तसेच विविध राजकीय पक्षांना नगरपंचायतीकडून अधिकृत पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.

मा. उच्च न्यायालयातील जनहित याचिका क्र. १५५/२०११ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ अंतर्गत जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही कारवाई केली जाणार असल्याचे नगरपंचायतीने स्पष्ट केले आहे.

नगरपंचायतीच्या निर्देशानुसार कोणतेही जाहिरात फलक, बॅनर, फ्लेक्स किंवा होर्डिंग्ज छापण्यापूर्वी संबंधित ग्राहकाकडे कणकवली नगरपंचायतीकडून IWBP प्रणालीद्वारे जारी करण्यात आलेला ना-हरकत परवाना (NOC) आणि अधिकृत QR कोड असणे बंधनकारक आहे. हा QR कोड संबंधित जाहिरातीवर स्पष्टपणे दर्शविणे आवश्यक राहणार आहे.

राष्ट्रीय सण, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस किंवा अन्य कोणत्याही कार्यक्रमासाठी लावण्यात येणाऱ्या बॅनर, फ्लेक्स व होर्डिंग्जवर आवश्यक परवानगी व QR कोड नसल्यास ते छापू नयेत, असे स्पष्ट निर्देश प्रिंटिंग प्रेस चालकांना देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित जाहिराती तात्काळ हटविण्यात येणार आहेत.

पावसाळ्यात जोरदार वारे, मुसळधार पाऊस व नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर धोकादायक बॅनर व होर्डिंग्जमुळे नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच वाहतुकीला अडथळा, अपघात तसेच वीज तारा व खांबांवर पडून शॉर्टसर्किट होण्याचाही धोका असल्याने सर्व धोकादायक फलक तातडीने हटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असून, परवानगीशिवाय बॅनर किंवा होर्डिंग्ज छापणाऱ्या प्रिंटिंग प्रेसवरही कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचा इशारा कणकवली नगरपंचायतीने दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा