You are currently viewing आंबोलीत ‘स्वच्छतेची वारी’; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा प्रत्यक्ष सहभाग
Oplus_16908288

आंबोलीत ‘स्वच्छतेची वारी’; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा प्रत्यक्ष सहभाग

पर्यटकांना स्वच्छता व जबाबदार पर्यटनाचा संदेश, शेकडो ग्रामस्थांची उपस्थिती

सावंतवाडी :

सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासासाठी स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असून, यापुढे जबाबदार पर्यटन असणे गरजेचे आहे. स्वच्छता राखणे ही केवळ प्रशासनाचीच नाही, तर पर्यटकांची आणि स्थानिक नागरिकांचीही तितकीच जबाबदारी आहे. आंबोलीतील या स्वच्छता वारीमुळे संपूर्ण जिल्ह्यासह शेजारील गोवा, कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रात स्वच्छतेचा एक सकारात्मक संदेश पोहोचेल, असे प्रतिपादन सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.

ग्रामपंचायत आंबोली आणि ‘स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग’ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आंबोली येथे भव्य स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.

आंबोली घाट मार्गावरील ‘पूर्वीचा वस’ या देवस्थानाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या ‘स्वच्छतेच्या वारीला’ सुरुवात झाली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः हातात कचरा उचलून मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. ‘पूर्वीचा वस’ देवस्थान ते आंबोली पोलिस चौकी या मार्गावरील कचरा उचलल्याने हा संपूर्ण परिसर स्वच्छ आणि सुंदर बनला. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक पर्यटकांना जिल्हाधिकारी व प्रशासनाच्या हस्ते ‘जबाबदार पर्यटन व स्वच्छतेचे आवाहन’ करणारी पत्रके वाटण्यात आली.

आपल्या भाषणात पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाल्या की, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दरवर्षी लोकसंख्येच्या तिप्पट संख्येने पर्यटक येतात. त्यामुळे स्वच्छतेबरोबरच पर्यटकांची सुरक्षाही महत्त्वाची आहे.

याप्रसंगी प्रास्ताविक करताना स्वच्छता मिशनचे निमंत्रक गणेश जेठे यांनी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय वेगाने वाढत असून संपूर्ण जिल्हा पूर्णपणे स्वच्छ करणे हेच स्वच्छता मिशनचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले.

तसेच आंबोली ग्रामपंचायतीच्या प्रशासक व माजी सरपंच सावित्री पालेकर यांनी स्वच्छता मिशनच्या या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला. आंबोलीमध्ये पर्यटन वाढीसोबत स्वच्छता ठेवण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करत असून वाढत्या पर्यटक संख्येमुळे शासनाकडूनही सहकार्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. या मोहिमेची सांगता राष्ट्रगीत गाऊन आणि स्वच्छतेचा निश्चय करून करण्यात आली.

या मोहिमेत सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, प्रभारी प्रांताधिकारी वीरसिंग वसावे, गटविकास अधिकारी निलेश जाधव, निवासी नायब तहसीलदार दिलीप पाटील, वनपाल सम्राट पाटील, चौकुळ ग्रामपंचायत प्रशासक व माजी सरपंच गुलाबराव गावडे, पंचायत समिती सदस्य मायकेल डिसोझा, गेळेचे सरपंच सागर ढोकरे, स्वच्छता विभागाचे श्री. किनळेकर, आंबोली टुरिझम व पर्यटन व्यावसायिक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष निर्णय राऊत, कार्याध्यक्ष आदर्श राऊत, स्वच्छता प्रेमी मोहन पडवळ, अनिल मेस्त्री, आनंद परब, संजय सावंत, विजय जामदार, विनायक पाताडे, पोलिस पाटील राणे, मंगेश नेवगी, प्रदीप फोपे, सचिन राणे, उत्तम सावंत, तुषार नेवरेकर, सतीश घाडी, तलाठी नंदकुमार ठेरे, रेस्क्यू टीमचे वामन पालेकर, ग्रामसेवक संदीप गोसावी, ग्रा.पं.स. काशीराम राऊत, शंकर चव्हाण, चौकुळचे माजी सरपंच सुरेश शेटवे, सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण गुरव, शंकर गावडे तसेच पोलिस हवालदार संतोष गगोले, लक्ष्मण काळे, सचिन चव्हाण, पोलिस नाईक गौरव परब, वनविभागाचे तानाजी चव्हाण, वासुदेव खोत, सुधीर काळसे, संकल्प जाधव, अनिकेत देशमुख, बाळा सोमा गावडे, दिव्या थरुडे, संग्राम पाटील, बदाम राठोड, सुरेश कोकरे यांच्यासह पोलिस, वनविभाग व ग्रामपंचायतीचे कर्मचारी, पर्यटन व्यावसायिक आणि शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा