You are currently viewing युवाईची वादग्रस्त पोष्ट…

युवाईची वादग्रस्त पोष्ट…

*सुचली की कोठून आली..?*

 

बाबरी मशीद जमीनदोस्त होऊन आज तब्बल तीन दशके उलटून गेली. कोर्ट-कचेऱ्या, वाद-विवाद अन् निकाल आदी सर्व घडामोडीनंतर अयोध्यानगरी मध्ये प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहिले. संपूर्ण भारत देशात हिंदू धर्मियांनी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दिवस दिवाळी असल्याप्रमाणे साजरा केला. देश विदेशातून अनेकांनी सोहळ्याचे स्वागत केले. राजकीय बाबी दुर्लक्षिल्या तर ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचे मूळ मंदिर होते तिथेच नव्याने मंदिर उभे राहिले. दरम्यान शेकडो वर्षांची बाबरी मशीद पाडली गेली ही सल काहींच्या मनात असू शकते, परंतु ज्या अयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली तिथे आनंदी आनंद असताना महाराष्ट्राचे दक्षिण टोक असलेल्या कोकणातील सुंदर शहर सावंतवाडी व वेंगुर्ला येथे दुधाचे दात सुद्धा न पडलेल्या तरुण तरुणींकडून इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया ॲपवर धार्मिक वाद उत्पन्न होतील अशी पोष्ट का शेअर केली जाते..? एकाने पोष्ट शेअर केल्यावर इतरांनी तीच पोष्ट शेअर करून त्याला पाठिंबा देणे, लाइक्स करून खुले समर्थन देणे म्हणजे देशाच्या न्यायव्यवस्थेने दिलेल्या निर्णयाचा अपमान करण्यासारखेच आहे…! बरं हे कोणी केलंय..?

तर ज्यांना नुकतीच अठरा वर्षे पूर्ण होत आहेत अशा ज्युनियर महाविद्यालयातील शिकणाऱ्या तरुण तरुणींनी..!

एका दिवशी तिघांनी एखादी वादग्रस्त पोष्ट शेअर केल्यावर व हिंदू समाजातील लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर अन् गुन्हा दाखल झाल्यावर पुन्हा दुसऱ्या ज्युनियर महाविद्यालयीन काही युवतींकडून दुसऱ्या दिवशी सदर पोष्ट पुन्हा शेअर केली जाते हे नक्कीच आक्षेपार्ह…!

हे असे धाडस या तरुण तरुणींमध्ये येतं कुठून..?

इंस्टाग्रामवर पोष्ट शेअर केलेली ती पोष्ट त्यांच्याकडे आली कुठून..?

त्यावर लिहिलेल्या भडकावू ओळी लिहिल्या कोणी..?

पोष्ट कोणी कोणी लाइक्स केली..? पोस्टच्या खाली कुणाच्या, कसल्या कमेंट आहेत..?

या सर्व बाबींचा विचार होणे आज आवश्यक बनले आहे. कारण ही येणारी भावी पिढी सुसंस्कृत झाल्यावर सुसंस्कारित न होता विद्रोहाकडे झुकत असेल तर युवाईच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून ते घातक आहे. कुठेतरी अशा विनाशक प्रवृत्तीला आळा बसला पाहिजे.

कोकणात यापूर्वी अशा प्रवृत्ती नव्हत्या. सर्वधर्मीय आनंदाने, एकोप्याने, सलोख्याने राहत होते. एकमेकांना एकमेकांप्रती आदरभाव होता, आजही आहे.. परंतु, तांदूळ सफेद दिसले तरी तांदळात असलेले तांबूस सफेद खडे दाताखाली आले की दात सुद्धा हालतात. त्यामुळे खडा दाताखाली येऊ नये याची काळजी सर्वधर्मीयांनी घेतली पाहिजे. वेंगुर्ला येथे एका युवकाकडून औरंगजेबाचे पोष्टर स्टेटस ठेवण्यात आले. त्याचा उद्रेक होऊन वेंगुर्लावासियांकडून जे कृत्य घडले ते सर्वांनी पाहिलं, वाचलं, ऐकलं आहे. परंतु अशी वेळ वेंगुर्ला वासियांवर का आली..? यावर देखील विचार होणे आवश्यक आहे. समाजात तेढ निर्माण करणे, वाद विवाद उत्पन्न करणे याखेरीज तिसरा कोणताही उद्देश असे दुष्कृत्य करण्यामागे अजून तरी दिसत नाही. मग असं करणारी तरुण मुले कोणाच्या आशीर्वादावर हे धाडस करतात..?

महागडे मोबाईल आपल्या कॉलेज शिकणाऱ्या अल्पवयीन मुलांना देताना आपली मुले त्याचा वापर कशासाठी करतात..? याचा पालक कधी विचार करणार आहेत की नाहीत..? अशा मुलांवर धर्मांधतेचे हे संस्कार कोणाकडून होतात..? त्यांच्या घरातूनच असे संस्कार होतात की आणखी कोणी अशा कोवळ्या वयातील तरुण तरुणींच्या संपर्कात असतात..? त्यांच्यावर असे विघातक संस्कार करतात..? याची सुद्धा सखोल चौकशी व्हायला हवी.

कारण, अशाचप्रकारे धर्माधर्मात तेढ निर्माण झाली तर भविष्यात “भाईचारा” हा शब्दच नामशेष होईल.

सदरच्या घटनांमुळे आज वेंगुर्ला शहर बंद ठेवण्यात आले, तर सावंतवाडीत सर्व पक्षातील हिंदू धर्मियांनी एकत्र येत सावंतवाडी शहरातील विशिष्ट धर्माच्या लोकांचे अनधिकृत धंदे, स्टॉल, दुकाने आदी हटवण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर हिंदू धर्मियांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा सावंतवाडी पोलीस स्टेशनवर वळविला आणि सदर इंस्टाग्राम स्टोरी प्रकरणात धर्मा धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या सर्वांना गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली होती. दरम्यान सावंतवाडी शहरासह पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले, आणि लोकांचा वाढत चाललेला रोष पाहता ज्यादा पोलीस कुमक मागविण्यात आली.. तर उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे, बांदा पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्यामराव काळे, सावंतवाडीचे निरीक्षक ऋषिकेश अधिकारी पोलिस स्टेशनमध्ये ठाण मांडून बसले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल हे सायंकाळी सावंतवाडीत दाखल झाले, शहरात शांतता बिघडू नये म्हणून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांना त्यांनी आवाहन केले.

दरम्यान वादग्रस्त पोष्ट शेअर करून जातीय सलोखा बिघडविणाऱ्या कामरान आयुब संगत्राश (वय १८, बाहेरचावाडा), समरिन जहीर खान बिजली (वय १९, बाहेरचावाडा), लबिबा कादर खान (२१, बाहेरचावाडा) यांच्या सह अल्पवयीन अन्य दोघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. यातील वरील तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले व त्यांना २७ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर अल्पवयीन अन्य दोघांना बाल न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × five =