You are currently viewing गणेशोत्सव काळात वाहतुक कोंडी रोखण्यासाठी निर्णय

गणेशोत्सव काळात वाहतुक कोंडी रोखण्यासाठी निर्णय

गणेशोत्सव काळात वाहतुक कोंडी रोखण्यासाठी निर्णय…!

गणेशोत्सव न.पं.मध्ये प्रशासन, लोकप्रतिनिधी व व्यापाऱ्यांची आढावा बैठक…!

कणकवली

गणेशोत्सव काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होतात. त्यामुळे कणकवली शहरात होणारी वाहतूक कोंडी रोखणे तसेच उड्डाणपुलाखालील भाजी, फळे, फुले विक्रेत्यांच्या जागा निश्चित करणे, शहरातील वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करणे आदी विषयावर चर्चा करण्यासाठी कणकवली नगरपंचायतच्या सभागृहात मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील व्यापारी, फळ-फुल विक्रेते, महावितरणचे अधिकारी, महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी व पोलिस अधिकारी यांची बैठक पार पडली.

या बैठकीत मराठा मंडळ रस्ता व नरडवे रस्ता करताना लक्झरी बसेस पार्किंग तसेच स्टेट बँक ते शक्ती इंटरप्राईजेस येथील उड्डाणपुलाखाली महामार्ग प्राधिकरण परवानगी दिल्यास दुचाकी वाहनांसाठी पार्किंगचे नियोजन करण्यात आले. याखेरीज गावठी भाजी विक्रेते आणि इतर विक्रेत्यांसाठीही जागा लवकरच निश्चित करून दिल्या जातील असे मुख्याधिकारी परितोष कंकाळे यांनी सांगितले. या व्यतिरिक्त शहर बाजापरेठेत रस्त्यावर दुकाने थाटल्यास त्या व्यापारी, विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तर आचरा मार्गे जाणारी अवजड वाहतूक मसुरकर किनई लेन मार्गे सोडण्याचेही निश्चित करण्यात आले. तसेच १६ ते २९ सप्टेंबर दरम्यान शहरात येणारी अवजड वाहने मात्र स्थानिक व्यापाऱ्यांची मालाची वाहतूक वगळता इतर अवजड वाहतूक सर्विस रस्त्याने न येता सरळ उड्डाण पुलावरून करण्यात यावी अशा सूचना पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे शहरात अनधिकृत पार्किंग तसेच बेवारस वाहनावरती कारवाई करण्यात येणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.

यावेळी पोलीस निरीक्षक अमित यादव, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक अभी मुसळे, सुशांत नाईक, कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, माजी नगरसेविका मेघा गांगण, व्यापारी दीपक बेलवलकर, अनिल हळदीवे, राजन पारकर, नंदकिशोर आळवे, प्रकाश काळगे, महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता एम. आर. साळुंखे, रवींद्र गायकवाड, महावितरणचे सहाय्यक अभियंता एस. एस. शिंदे, ज्येष्ठ नागरिक दादा कुडतरकर यांच्यासह आदी स्थानिक व्यापारी व फुल विक्रेते उपस्थित होते.

परितोष कंकाळ म्हणाले गणपती सानाव इतर गणपती विसर्जन स्थळावरील सर्व व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फ वाढलेले रान कटिंग करण्याचे काम तसेच डास फवारणी करण्याचे नियोजन ही करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. अनिल हळदीवे म्हणाले उड्डाणपुलाखालील भाजी, फळ, फुल विक्रेते यांना उड्डाणपुलाखाली बसण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने मुदतवाढ दिली नाही. परंतु महामार्ग प्राधिकरण स्टॉल हटाव मोहीम राबवली तर त्यांनी उड्डाणपुलाखाली बसलेल्या व्यापारावर कारवाई न करता त्यांच्या हद्दीमधील सर्व विक्रेत्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली. त्यावर श्री कंकाळ म्हणाले, जर महामार्ग प्राधिकरणाने गणेशोत्सव कालावधीत उड्डाणपुलाखालील विक्रेत्यांना व त्यांच्या हद्दीतील अन्य विक्रेत्यांना विक्री करण्यास परवानगी दिल्यास त्या विक्रेत्यांना जागा निश्चित करून देण्यात येईल त्यांनी त्या जागेतच आपली विक्री करावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

त्याचप्रमाणे गणेशोत्सवापूर्वी महावितरण ने विद्युत वाहिन्यांवरील धोकादायक असलेल्या झाडांच्या फांद्या कटिंग कराव्यात. तसेच गणेशोत्सव कालावधीत वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी सर्व देखभाल दुरुस्तीची कामे गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करावीत अशा सूचना देण्यात आल्या. दादा कुडतरकर यांनी महामार्गावर स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी केली त्यावर समीर नलावडे म्हणाले कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून महामार्ग ठीक ठिकाणी मोबाईल स्वच्छतागृह ठेवण्यात येतील असे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा