You are currently viewing विट्यात साडेसात लाखांची रोकड असलेली बॅग दुचाकीस्वारांनी पळवली!

विट्यात साडेसात लाखांची रोकड असलेली बॅग दुचाकीस्वारांनी पळवली!

विटा / प्रदीप जोशी :

विटा बसस्थानक परिसरात प्रवाशांची वर्दळ सुरू असताना दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी एका प्रवाशाची साडेसात लाख रुपये रोकड असलेली बॅग पळविल्याची धक्कादायक घटना घडली. भरवस्तीत आणि वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सायंकाळच्या सुमारास विटा बसस्थानक परिसर नेहमीप्रमाणे प्रवाशांच्या गर्दीने गजबजलेला होता. परजिल्ह्यात जाण्याच्या तयारीत असलेला एक प्रवासी हातातील बॅग सांभाळत बसची प्रतीक्षा करीत उभा होता. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी संधी साधली. प्रवाशाला काही समजण्याच्या आतच दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाने त्याच्या हातातील बॅग हिसकावून घेतली. त्यानंतर दोघांनी दुचाकी वेगाने पळवत घटनास्थळावरून पलायन केले.

या बॅगेत तब्बल साडेसात लाख रुपये रोख असल्याची माहिती समोर आल्यानंतर शहरात मोठी चर्चा सुरू झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दुचाकीस्वारांनी बॅग पळविल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, तक्रारदार प्रवाशाने बॅगेत साडेसात लाख रुपयांची रोकड असल्याचे पोलिसांना सांगितले. रात्री उशिरापर्यंत विटा पोलीस ठाण्यात या प्रकरणी अधिकृत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

वर्दळीच्या ठिकाणी चोरीचा प्रकार

बसस्थानकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी प्रवाशाची रोकड असलेली बॅग पळविण्याचा प्रकार घडल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून या घटनेमुळे विटा शहरात खळबळ उडाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा