You are currently viewing आजच्या सामाजिक परिस्थितीला मार्गदर्शक ठरणारी शीख धर्माचे संस्थापक गुरू नानकांची समतेची शिकवण

आजच्या सामाजिक परिस्थितीला मार्गदर्शक ठरणारी शीख धर्माचे संस्थापक गुरू नानकांची समतेची शिकवण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शोभा वागळे लिखित अप्रतिम लेख*

 

*आजच्या सामाजिक परिस्थितीला मार्गदर्शक ठरणारी शीख धर्माचे संस्थापक गुरू नानकांची समतेची शिकवण*

 

समाजात जेव्हा अंधश्रद्धा, रूढी-परंपरा आणि उच्च-नीचतेच्या भिंती भक्कम झाल्या होत्या, तेव्हा समाजातील विषमता, अंधश्रद्धा आणि द्वेष नष्ट करून माणुसकीचा आणि समतेचा नवा प्रकाश घेऊन अवतरलेले थोर युगपुरुष म्हणजे *शीख धर्माचे संस्थापक गुरू आणि*

*शीख परंपरेतील पहिले गुरू नानकदेव होय*

त्यांचा जन्म १५ एप्रिल १४६९ रोजी तलवंडी (म्हणजे सध्याचे नानकाना साहिब, पाकिस्तान) येथे झाला. गुरू नानकदेवांनी आपल्या साध्या, सरळ आणि प्रभावी विचारांनी समाजाला नवी दिशा दिली. आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगातही त्यांचे विचार तितकेच कालसुसंगत आणि प्रेरणादायी आहेत.

 

गुरू नानकदेवांनी समाजाला ‘इक ओंकार’ म्हणजेच ‘ईश्वर एकच आहे’ हा मूलमंत्र दिला. माणसाची ओळख त्याच्या जातीवरून किंवा धर्मावरून नाही, तर त्याच्या सद्गुणांवरून आणि कर्मावरून होते, असे त्यांनी ठामपणे सांगितले. अंधश्रद्धा आणि कर्मकांडांवर प्रहार करत त्यांनी भक्तीचा सोपा मार्ग दाखवला.

सुखी आणि समाधानी जीवनासाठी त्यांनी

‘नाम जपो’ म्हणजे: ईश्वराचे स्मरण करणे.

‘किरत करो’ म्हणजे: प्रामाणिकपणे काम करणे ‘वंड छको’ म्हणजे: सर्वांसोबत वाटून खाणे

अशी त्रिसूत्री तत्वे लोकांना सांगितली.

त्यांनी सुरू केलेली ‘लंगर’ प्रथा आजही जगभरातील गुरुद्वारांमध्ये कोणत्याही भेदाशिवाय सर्वांना एकत्र बसवून भोजन देत सामाजिक समतेचा संदेश देत आहे.

गुरू नानक देवांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला. तरी लहानपणापासूनच त्यांना आध्यात्मिक चिंतन, निसर्ग आणि समाजकल्याणाची विशेष आवड होती.

लहानपणापासूनच त्यांना सामाजिक विषमतेला ठाम विरोध होता. समाजात स्त्रियांना दिली जाणारी दुय्यम वागणूक आणि जातीभेद त्यांना अजिबात मान्य नव्हता. त्यांनी नेहमीच समता, बंधुता आणि माणुसकीची शिकवण दिली.

त्या काळात समाजात पसरलेली अंधश्रद्धा, कर्मकांड आणि जातिभेद दूर करण्यासाठी गुरू नानकदेवांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. “ईश्वर एकच आहे आणि तो सर्वत्र वास करतो” (‘इक ओंकार’), हा महान संदेश त्यांनी जगाला दिला. त्यांच्या मते, कोणताही माणूस जन्माने लहान किंवा मोठा नसतो, तर त्याचे कर्म त्याला श्रेष्ठ बनवते.

नानकदेवांनी आपल्या साध्या, पण प्रगल्भ विचारांनी भारतीय समाजमनावर अमिट ठसा उमटवला. आज २१ व्या शतकात, जेव्हा जग तांत्रिकदृष्ट्या प्रगत होत असतानाही सामाजिक तेढ आणि तणावाचा सामना करत आहे, तेव्हा गुरू नानकदेवांची शिकवण अधिकच कालसुसंगत ठरते.

गुरू नानकदेवांच्या तत्त्वज्ञानाचा पाया ‘इक ओंकार’ (ईश्वर एकच आहे) या विचारावर उभा आहे. ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही अवडंबराची किंवा मध्यस्थाची गरज नसून शुद्ध आचरण आणि निर्मळ भक्ती पुरेशी आहे, असे त्यांनी सांगितले. “ना को हिंदू, ना को मुसलमान” असे म्हणत त्यांनी धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन ‘माणूस’ म्हणून जगण्याचा संदेश दिला. विशेष म्हणजे, त्या काळी स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जात असताना, “ज्या स्त्रीने राजांना जन्म दिला, तिला कमी कसे लेखता येईल?” असा परखड सवाल करून ते स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करणारे ते आद्य विचारवंत बनले.

गुरू नानकदेवांनी, सत्य, प्रेम आणि शांततेचा संदेश देण्यासाठी, पायी प्रवास करत भारत, तिबेट आणि अरब देशांपर्यंत चार मोठ्या यात्रा केल्या. त्यांच्या काव्यरचना पवित्र ‘गुरू ग्रंथ साहिब’ मध्ये समाविष्ट आहेत.

 

*’गुरू ग्रंथ साहिब*’ हा शीख धर्माचा सर्वोच्च, प्रवित्र धर्मग्रंथ असून, शिखाकडून त्याला जीवंत ‘शाश्वत गुरू’मानले जाते.

१६०४ मध्ये या ग्रंथाचे पहिले संकलन ‘आदि ग्रंथ’ गुरू परंपरेचे पाचवे शीख गुरू, *’गुरू अर्जन देव जी’* ह्यांनी पूर्ण केले. आणि शेवटचे गुरू, *गुरू गोविंद सिंह* जी नी १७०८ मध्ये आपल्या वडिलांचे (गुरू तेग बहादूर जी) श्लोक यात समाविष्ट करून या ग्रंथाला अंतिम स्वरूप दिले आणि यापुढे हा ग्रंथच शिखांचा गुरू असेल असे घोषित केले.

या ग्रंथामध्ये केवळ शीख गुरूंचेच नव्हे, तर *संत नामदेव, संत कबीर, संत रविदास, शेख फरीद* यांसारख्या विविध जाती-धर्माच्या अनेक भारतीय संत आणि भक्तांचे श्लोक व विचार समाविष्ट आहेत.

 

हा ग्रंथ गुरू मुखी लिपीत लिहिलेला असून

त्यात पंजाबी, ब्रज, खडी बोली, संस्कृत आणि फारसी या भाषांचा वापर आढळतो.

ह्या ग्रंथात एकूण *१,४३० पृष्ठे म्हणजे *’अंग’*

आणि ह्यातील काव्य ३१ रांगांमध्ये संगीतबद्ध केलेले असून त्याचे गायन व किर्तन केले जाते.

थोडक्यात, गुरू ग्रंथ साहिब हा मानवता, प्रेम, भक्ती आणि बंधुभाव यांचा संदेश देणारा एक वैश्विक ज्ञानकोश आहे.

 

कार्तिक पौर्णिमेला साजरा होणारा ‘गुरुपूरब’ हा केवळ प्रकाशोत्सव नसून, गुरू नानकदेवांच्या विचारांचे स्मरण करण्याचा दिवस आहे.

आपल्या विचारांतील अंधार दूर करण्याचा संकल्प दिवस आहे. समाजात शांतता, सहिष्णुता आणि बंधुभाव टिकवून ठेवण्यासाठी गुरू नानकदेवांचे विचार आजही दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहेत. ते आपण सर्वांनी आवर्जून अवलंबावे ही सदिच्छा.

 

*शोभा वागळे*

पुणे.

8850466717

प्रतिक्रिया व्यक्त करा