शस्त्र परवान्यांच्या नूतनीकरणासाठी जिल्ह्यात तालुकानिहाय विशेष शिबिरे!
१ ते ३१ डिसेंबरदरम्यान आयोजन; ३१ डिसेंबर २०२६ रोजी मुदत संपणाऱ्या परवानाधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग :
जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांच्या परवाना नूतनीकरणासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तालुकानिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या परवान्यांची मुदत ३१ डिसेंबर २०२६ रोजी संपत आहे, अशा परवानाधारकांनी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सकटे यांनी जाहीर नोटिशीद्वारे केले आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून ही शिबिरे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत आयोजित करण्यात आली आहेत. त्याचे तालुकानिहाय वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
तालुकानिहाय शिबिरांच्या तारखा :
सावंतवाडी : १, २ व ३ डिसेंबर २०२६
दोडामार्ग : ४ व ७ डिसेंबर २०२६
वेंगुर्ला : ८, ९ व १० डिसेंबर २०२६
कुडाळ : ११, १४ व १५ डिसेंबर २०२६
मालवण : १६, १७ व १८ डिसेंबर २०२६
कणकवली : २१, २२ व २३ डिसेंबर २०२६
देवगड : २४, २८ व २९ डिसेंबर २०२६
वैभववाडी : ३० व ३१ डिसेंबर २०२६
नूतनीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे
शस्त्र परवाना नूतनीकरणासाठी छायाचित्र व संपूर्ण माहितीसह विहित नमुन्यातील Form A-3 अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तसेच शस्त्र वापरण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय अथवा जिल्हा शल्यचिकित्सक यांचे S-3 नमुन्यातील प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे.
याशिवाय संबंधित पोलीस निरीक्षकांची सही व शिक्क्यासह Form S-8, शस्त्र पडताळणी केल्याबाबत संबंधित पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांचे प्रमाणपत्र, सरपंच, पोलीस पाटील किंवा नगराध्यक्ष यांच्याकडील रहिवासी व वर्तणुकीचा दाखला अथवा आधारकार्ड आणि मूळ शस्त्र परवान्याची प्रत सादर करणे बंधनकारक आहे.
पाच वर्षांसाठी २,५०० रुपये शुल्क
शस्त्र परवान्याच्या पाच वर्षांच्या नूतनीकरणासाठी २ हजार ५०० रुपये शुल्क शासनाकडे जमा करावे लागणार आहे. नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिवर्षी ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. विलंब झालेल्या प्रकरणांमध्ये सबळ पुराव्यांसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
Form A-3 अर्ज तहसीलदार कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात उपलब्ध आहे. अर्ज पोस्टाद्वारे अथवा तालुक्याच्या ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत. तसेच नूतनीकरण केलेला शस्त्र परवाना पोस्टाने पाठविण्यात येणार नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
एकाच दिवशी गर्दी होऊ नये, यासाठी तालुकानिहाय स्वतंत्र तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित तालुक्यातील शस्त्र परवानाधारकांनी निर्धारित तारखेला व वेळेत आवश्यक कागदपत्रांसह आणि शस्त्र परवान्यासह उपस्थित राहून नूतनीकरणाची कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
