दिवाळीच्या मिठाई-फराळावर अन्न व औषध प्रशासनाचा छापा!
सिंधुदुर्गात ४३ हजार ५८५ रुपयांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त; १३ ठिकाणी तपासणी, १७ नमुने प्रयोगशाळेत
सिंधुदुर्ग :
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मिठाई आणि फराळाच्या पदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत तब्बल ४३ हजार ५८५ रुपये किमतीचा संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. पाच दिवस चाललेल्या या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील १३ ठिकाणी तपासणी करण्यात आली असून, विविध अन्नपदार्थांचे १७ नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी संकलित करण्यात आले आहेत.
या कारवाईत कुडाळ येथे ९८ किलो मावा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत ३९ हजार २०० रुपये आहे. तर कणकवली येथे ६ किलो खवा (२ हजार १४५ रुपये) जप्त करण्यात आला. याशिवाय कणकवलीतून ३ किलो पोहा चिवडा आणि ५ किलो शेव चिवडा असा एकूण ८ किलो फराळाचा साठा जप्त करण्यात आला. या फराळाची किंमत २ हजार २४० रुपये आहे.
विशेष तपासणी मोहिमेदरम्यान मोतीचूर लाडू, बुंदी लाडू, खवा-मावा, विविध प्रकारच्या मिठाई तसेच फरसाण यांचे नमुने घेण्यात आले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित विक्रेते आणि उत्पादकांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्तांनी दिली.
मिठाई-फराळ खरेदी करताना नागरिकांनी सावध राहावे
दिवाळीच्या सणात नागरिकांनी मिठाई आणि फराळाचे पदार्थ परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावेत. खरेदी करताना पक्के बिल घ्यावे, पदार्थांची मुदत तपासावी तसेच अनैसर्गिक गडद रंग असलेले अन्नपदार्थ खरेदी करणे टाळावे. अन्नपदार्थांमध्ये भेसळ असल्याचा संशय आल्यास तातडीने अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
