दिवाळीचा प्रकाश घराघरांत… घारपीच्या चिमुकल्यांचा जलसंवर्धनाचा संदेश मनामनांत!*
*पोस्टकार्डवर स्वतः शुभेच्छा संदेश तयार करून अधिकारी, पदाधिकारी व आप्तेष्टांना पाठविला पाणी बचतीचा संदेश*
*बांदा*(दि.५/११/२०२६)
दिवाळीच्या सणात घराघरांत पणत्या उजळत असताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या छोट्याशा पोस्टकार्डातून मोठा सामाजिक संदेश दिला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने पोस्टकार्डवर दिवाळीच्या शुभेच्छा संदेशांसोबत ‘पाणी वाचवा, पाणी जपवा’ आणि जलसंवर्धनाचे संदेश तयार केले.
दिवाळीच्या शुभेच्छा देण्याची पारंपरिक पद्धत जपत त्याला सामाजिक जाणीवेची जोड देत विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही पोस्टकार्डे पोस्टाद्वारे अधिकारी, पदाधिकारी, नातेवाईक, मित्रपरिवार व आप्तेष्टांना पाठविण्यात आली. त्यामुळे घारपीच्या दुर्गम शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जलसंवर्धनाचा संदेश पोस्टाच्या माध्यमातून अनेक घरांपर्यंत पोहोचला.
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; मात्र जीवनाचा खरा प्रकाश पाण्यामुळेच टिकतो, ही भावना विद्यार्थ्यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केली. ‘पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य आहे’, ‘पाणी जपा, भविष्य जपा’, ‘आज पाणी वाचवा, उद्याचे जीवन वाचवा’ अशा आशयाच्या संदेशांनी पोस्टकार्डांना सामाजिक जाणिवेची सुंदर किनार मिळाली.
चिमुकल्या हातांनी तयार केलेले पोस्टकार्ड, त्यावर स्वतः लिहिलेल्या शुभेच्छा आणि त्यातून दिलेला जलसंवर्धनाचा संदेश पाहता या विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या आनंदासोबत भविष्यातील पिढ्यांचीही काळजी मनात जपली असल्याचे दिसून आले.
दिव्यांनी घर उजळते; पण पाण्याचा प्रत्येक थेंब जीवन उजळतो. म्हणूनच दिवाळीच्या शुभेच्छांसोबत विद्यार्थ्यांनी दिलेला हा पाणी बचतीचा संदेश प्रत्येकाच्या मनात रुजण्यासारखा आहे.
‘आमच्या शुभेच्छा स्वीकारा… आणि आमची एक विनंतीही स्वीकारा—पाण्याचा प्रत्येक थेंब जपा!’ असा जणू भावनिक संदेशच या पोस्टकार्डांतून समाजाला देण्यात आला.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक जे. डी. पाटील, सहकारी शिक्षक आशिष तांदुळे व धर्मराज खंडागळे यांचे मार्गदर्शन लाभले.
