You are currently viewing इंदिरा गांधी पुण्यतिथी, सरदार पटेल जयंतीनिमित्त काँग्रेसतर्फे अभिवादन!

इंदिरा गांधी पुण्यतिथी, सरदार पटेल जयंतीनिमित्त काँग्रेसतर्फे अभिवादन!

इंदिरा गांधी पुण्यतिथी, सरदार पटेल जयंतीनिमित्त काँग्रेसतर्फे अभिवादन!

सावंतवाडीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा; पक्ष संघटन मजबूत करण्याचा निर्धार, सतेज पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर

सावंतवाडी :

सावंतवाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस (आय) कमिटीच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच पोलादी पुरुष स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी दोन्ही नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली वाहण्यात आली.
काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीत तसेच देशाच्या विकासात स्व. इंदिरा गांधी यांचे मोठे योगदान आहे. तर स्वातंत्र्यलढ्यात सरदार वल्लभभाई पटेल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्याच्या चळवळीत अनेक कार्यकर्त्यांचे बलिदान आणि त्याग सहन करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले, असे विचार यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते अॅड. दिलीप नार्वेकर, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर, तालुकाध्यक्ष अभय मालवणकर, सुनील पेडणेकर, बाब्या तथा रविंद्र म्हापसेकर आदींनी आपले विचार मांडले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने सर्वप्रथम आमदार निवडून दिल्यामुळे या मतदारसंघाच्या विकासाला चालना मिळाली. स्व. शिवरामराजे भोसले, स्व. प्रतापराव भोसले आणि माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले यांनी काँग्रेसचे आमदार म्हणून विधानसभेत प्रतिनिधित्व केले, याची आठवण यावेळी करून देण्यात आली.
दरम्यान, कोल्हापूर येथील माजी आमदार बंटी तथा सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ दूध संघावर काँग्रेसने निर्विवाद बहुमत मिळविल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
देशात वाढती महागाई, बेरोजगारी, महागड्या आरोग्य सुविधा, महागडे शिक्षण, पेपरफुटी आणि मतदानचोरी यांसारख्या प्रश्नांविरोधात काँग्रेसला पुन्हा एकदा जनआंदोलन उभे करावे लागणार आहे. सत्तेसाठी सुरू असलेले राजकारण आणि भ्रष्टाचार याविरोधात जनतेमध्ये जागृती करण्याची गरज असल्याचे मत उपस्थित काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते अॅड. दिलीप नार्वेकर यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला. वयाची ९० वर्षे पूर्ण होऊनही ते काँग्रेस पक्षासाठी सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांनी पूर्वी यूथ क्लब स्थापन करून सामाजिक कार्याला चालना दिली होती. सफाई कामगार संपावर गेल्यानंतर तब्बल ४२ दिवस स्वतः भंगी काम करून सामाजिक बांधिलकी जपली होती. अशा सामाजिक जाणिवा आजच्या युवकांमध्ये रुजविण्याचे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष पुन्हा मजबूत होत असून सहकार क्षेत्रातही पक्षाला यश मिळत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्षाच्या पाठीशी उभे राहावे आणि काँग्रेस सरकारच्या काळात सुरू झालेल्या विविध शासकीय योजना व सुविधा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी केले. काँग्रेस पक्ष पुन्हा संघटित करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी अॅड. दिलीप नार्वेकर, साक्षी वंजारी, राजू मसुरकर, अभय मालवणकर, सौ. सुमेधा सावंत, सुनील पेडणेकर, संजय लाड, अरुण भिसे, रविंद्र म्हापसेकर, अॅड. राघवेंद्र नार्वेकर, कौस्तुभ पेडणेकर, सुधीर मल्हार, विजय ओटवणेकर, आनंद आयरे, आकताब हेरेकर, संतोष जोईल, प्रदीप चौगुले, बाळा नमशी, प्रसाद ढवळे, संतोष तानावडे, विष्णू पेडणेकर, पीटर फर्नांडिस, सुभाष नाईक, संतोष पेडणेकर यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा